सामाईक जमिनीतील क्षेत्राची विक्री
सामाईक
जमिनीतील क्षेत्राची विक्री
वाचा : भारतीय नोंदणी कायदा,
कलम १७ ;
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६,
कलम १४९ व १५० ; मालमत्ता
हस्तांतरण कायदा १८८२, कलम ४४, ५४.
गावात एकूण चार एकर क्षेत्र असलेल्या
एका शेतजमिनीत, अरविंद, गोविंद, रमेश आणि सतिश या चार भावांचा
प्रत्येकी एक एकर (प्रत्येकी
चार आणे) हिस्सा
होता. अरविंदने
त्याचा सामाइकात असलेलला एक एकर हिस्सा नामदेवला नोंदणीकृत दस्ताने विकला. या व्यवहाराची कागदपत्रे
प्राप्त झाल्यानंतर तलाठी सर्व हितसंबंधीतांना नोटीस बजावली. नोटीस मिळाल्यावर गोविंद, रमेश आणि सतिश तलाठी भाऊसाहेबांकडे
गेले आणि अरविंदने सहहिस्सेधारकांची संमती न घेता जमीन विकली अशी लेखी स्वरुपात तक्रार
करुन ही नोंद मंजूर करु नये अशी विनंती केली.
मंडलअधिकारी चावडीला भेट देण्यास आले
तेव्हा तलाठी यांनी ही तक्रार त्यांच्या निदर्शनास आणली.
सुनावणीच्या दिवशी मंडलअधिकारी यांनी
अरविंद तसेच गोविंद, रमेश
आणि सतिश म्हणणे ऐकून घेतले, सर्वांचे जबाब घेतले आणि त्यांनी सादर केलेल्या पुराव्यांचे अवलोकन
केले.
गोविंद,
रमेश आणि सतिश यांचे म्हणणे होते की, सामाइकात असलेली जमीन अरविंदला, त्यांच्या परवानगीशिवाय विकता
येणार नाही.
अरविंदचे म्हणणे होते की, जमिनीची विक्री करण्यापूर्वी
त्याने गोविंद, रमेश
आणि सतिशला, तो
हिस्सा त्यांनी विकत घ्यावा अशी विनंती केली होती परंतु त्यांनी नकार दिला. म्हणून त्याने त्रयस्थाला
जमीन विकली. गोविंद, रमेश आणि सतिशने अरविंदचा
हिस्सा विकत घेण्यास नकार दिला होता असे त्यांच्या जबाबात सांगीतले होते.
मंडलअधिकारी
यांना लक्षात आले की, अरविंदला
अडचणीत आणण्याच्या उद्देशाने त्याचे भाऊ खोडसाळपणे तक्रार करीत आहेत.
मालमत्ता हस्तांतरण कायदा १८८२, कलम ४४ अन्वये अनेक सहधारकांपैकी
एक सहधारक आपल्या हिस्स्याचे क्षेत्र विकू शकतो.
अशा विक्रीमुळे ते क्षेत्र खरेदी घेणार्या
व्यक्तीला सहहिस्सेदाराचा दर्जा प्राप्त होतो.
मंडलअधिकारी यांनी वरील बाबींचा सविस्तर उल्लेख निकालपत्रात करुन तसेच अरविंदने स्वत:च्या हिस्स्यापुरतेच क्षेत्र विकले आहे याची खात्री करुन गोविंद, रमेश आणि सतिशच्या तक्रारीमध्ये तथ्य नसल्याचे नमूद करून त्यांची तक्रार फेटाळली आणि संबंधीत फेरफार प्रमाणित केला.
Comments