नोंदणीकृत ताबा गहाण खत/मुदत गहाण खत
वाचा
:
भारतीय नोंदणी कायदा, कलम १७ ; महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम
१९६६, कलम
१४९ व १५० ; मालमत्ता हस्तांतरण कायदा १८८२,
कलम ५८ ते १०४.
विलासने स्वत:च्या मालकी हक्काच्या जमिनीचे,
नोंदणीकृत ताबा गहाण खत/मुदत गहाण खत, यशवंतला नोंदणीकृत दस्ताने करून दिले. या व्यवहाराची
कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर तलाठी यांनी गाव नमुना ६ मध्ये त्याची नोंद घेऊन सर्व
हितसंबंधीतांना नोटीस बजावली. नोटीस मिळाल्यावर विलास आणि यशवंत दोघांनी तलाठी यांच्या
समक्ष हजर राहून नोटीस पुस्तकावर संमतीदर्शक स्वाक्षरी केली. मंडलअधिकारी यांनी मुदतीनंतर
संबंधीत फेरफार प्रमाणित केला.
यशवंत त्यानंतर पुन्हा तलाठी भाऊ
साहेबांकडे आला आणि म्हणाला की, आता विलासच्या जमिनीवर माझा ताबा आहे म्हणजेच
माझे पैसे जोपर्यंत विलास परत देत नाही तोपर्यंत मीच जमिनीचा मालक आहे. त्यामुळे
माझे नाव कब्जेदार म्हणून दाखल करावे.
तलाठी भाऊसाहेब नवीनच खात्यात आले
होते. त्यांनाही जमिनीचा कब्जा असणारा तो कब्जेदार हे म्हणणे पटले. त्यांनी
यशवंतचे नाव कब्जेदार सदरी दाखल केले आणि विलासचे नाव इतर हक्कात ठेवले. यामुळे
जमिनीच्या मूळ मालकाचे नाव इतर हक्कात नोंदविले गेले आणि जमीन गहाण घेणार्याचे नाव
७/१२
च्या कब्जेदार सदरी आले.
काही दिवसानंतर, स्वत:चे नाव कब्जेदार
सदरी असल्याचा फायदा घेऊन यशवंतने त्या जमिनीचा व्यवहार दुसर्या गावात राहणार्या
सदाशिव बरोबर केला. त्याच्याकडून जमिनीच्या ठरलेल्या किंमतीपैकी काही रक्कम
घेऊन अनोंदणीकृत साठेखत करुन दिले.
काही दिवसानंतर योगायोगाने सदाशिव
आणि विलासची भेट झाली. सदाशिवच्या बोलण्यातून यशवंतने केलेल्या बेकायदेशीर व्यवहाराबाबत
विलासला माहिती मिळाली. विलासला धक्काच बसला.
सदाशिव आणि विलासने तलाठी
भाऊसाहेबांकडे जाऊन सर्व हकीगत कथन केली. एका अनुभवी अधिकार्याच्या सल्ल्याने
विलासने उपविभागीय अधिकार्याकडे मुदत गहाण खताच्या फेरफार विरुध्द अपील दाखल
केले.
उपविभागीय अधिकार्यांनी त्या
अपिलाची सुनावणी घेतली. सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी या प्रकरणात निकाल
देतांना म्हटले की, "मालमत्ता हस्तांतरण कायदा १८८२, कलम ५३ अ अन्वये
ताबा गहाणखतामुळे जरी जमीन गहाण घेणार्या इसमास मालमत्ता ताब्यात ठेवण्याचा हक्क निर्माण
होत असला तरीही त्यास 'मालकी हक्क' प्राप्त होत नाही.
त्यामुळे ताबा गहाण खत/मुदत गहाण खतानुसार, जमीन गहाण घेणार्या
इसमाचे नाव ‘इतर हक्क’ सदरीच नोंदवणे कायदेशीर आहे.
गहाण देणार (जमिनीचा मूळ
मालक) याचे
नाव ७/१२
च्या कब्जेदार सदरीच ठेवावे. संबंधित तलाठी यांच्या कायद्यातील अज्ञानामुळे या प्रकरणात
गुंतागुंत निर्माण झाली आहे. त्यामुळे संबंधित तलाठ्याविरुध्द खातेनिहाय चौकशी
सुरू करावी आणि सदाशिव आणि विलासने यशवंतविरूध्द फसवणूकीचा फौजदारी गुन्हा दाखल
करावा.
पूर्वीचा फेरफार रद्द करण्यात
येत आहे. नवीन फेरफारद्वारे विलासचे नाव कब्जेदार सदरी घ्यावे आणि यशवंतचे नाव
इतर हक्कात नोंदवावे."
तलाठी यांच्या कायद्याच्या
अज्ञानामुळे किती गुतागुंत वाढली ! मनस्ताप झाला तो वेगळाच !!!
Comments