ए.कु.मॅ. च्या वारस नोंदी
ए.कु.मॅ. च्या वारस नोंदी
वाचा : हिंदू वारसा कायदा १९५६ ; महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १४९ व १५०.
हंबीररावांना बिपीन, सचिन, आणि आदित्य
अशी एकूण तीन मुले होती. हंबीररावांची पत्नी मयत होती. हंबीरराव मयत झाले तेव्हा
बिपीन सज्ञान होता, सचिन आणि आदित्य अज्ञान होते. हंबीररावांच्या नावे असणार्या
शेत जमिनीवर त्यांच्या तिन्ही मुलांची नावे वारस म्हणून दाखल झाली पैकी बिपीनचे
नाव 'एकत्र कुटुंब मॅनेजर (ए.कु.मॅ.)' म्हणून सात-बारावर दाखल झाले. सचिन आणि
आदित्य सज्ञान झाले, त्यांचा विवाह झाला, ते नोकरी निमित्त बाहेगावी गेले तरीही
महसूल दप्तरी ते 'अज्ञान'च राहीले.
कालांतराने सात-बारा पुनर्लेखनाच्या
वेळी बिपीनच्या नावासमोर 'ए.कु.मॅ.' लिहिण्याचे राहून गेले आणि बिपीनचे नाव सात-बारा
सदरी मालक म्हणून असल्याचे दिसू लागले.
बिपीन मयत झाल्यानंतर बिपीनच्या
अजय आणि विजय या दोन मुलांनी मयत बिपीनचे वारस म्हणून नाव दाखल व्हावे म्हणून
तलाठी कार्यालयात अर्ज व कागदपत्रे दाखल केली. कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर तलाठी
भाऊसाहेबांनी अर्जानुसार गाव नमुना ६ क मध्ये नोंद घेतली.
ही माहिती सचिन आणि आदित्यच्या
मुलांना कळताच त्यांनी तलाठी यांच्याकडे सदर वारस नोंदीवर लेखी हरकत दाखल केली.
तलाठी भाऊसाहेबांनी त्यांना तक्रारीची
पोहोच नमुना १० मध्ये दिली. त्यानंतर ती तक्रार गाव नमुना ६-अ मध्ये नोंदवली.
मंडलअधिकारी
चावडीला भेट देण्यास आले तेव्हा तलाठी यांनी ही तक्रार त्यांच्या निदर्शनास आणली. मंडलअधिकारी यांनी नमुना
१२ मध्ये सर्व हितसंबंधीतांना नोटीस देऊन पंधरा दिवसानंतर सर्वांना त्याच चावडीत, पुराव्याच्या कागदपत्रांसह
हजर ठेवण्याचे निर्देश तलाठी यांनी दिले.
सुनावणीच्या दिवशी सचिन आणि आदित्यच्या
मुलांनी, हंबीरराव मयत झाल्यानंतर ज्या फेरफारने बिपीनचे नाव 'एकत्र कुटुंब
मॅनेजर (ए.कु.मॅ.)' म्हणून सात-बारावर दाखल झाले होते तो फेरफार दाखल केला.
मंडलअधिकार्यांच्या लक्षात आले की,
आज जरी सात-बारा सदरी एकट्या बिपीनचे नाव दिसत असले तरी ती सात-बारा पुनर्लेखनाच्या
वेळी झालेली चूक आहे. पुनर्लेखनाच्या वेळी बिपीनच्या नावासमोर 'ए.कु.मॅ.' लिहिण्याचे
राहून गेले आणि ही गोष्ट कोणाच्याच लक्षात आली नाही.
बिपीनसह, सचिन आणि आदित्य हे ही
हंबीररावांचे कायदेशीर वारस असल्यामुळे, बिपीनच्या मृत्यूनंतर फक्त त्याच्याच
वारसांची नावे, त्याचे वारस म्हणून दाखल करणे पुरेसे नाही तर सचिन, आणि आदित्यची
नावेही सात-बारा सदरी कब्जेदार म्हणून दाखल करणे आवश्यक व कायदेशीर आहे.
हंबीरराव मयत झाले तेव्हाचा फेरफार बघितल्यानंतर
अजय आणि विजय यांना काहीच बोलता आले नाही. त्यांना सचिन आणि आदित्यचा वारस हक्क
कबूल करावा लागला.
मंडलअधिकारी यांनी वरील बाबींचा सविस्तर
उल्लेख निकालपत्रात केला आणि बिपीनच्या वारसांबरोबरच सचिन आणि आदित्यची नावेही
सात-बारा सदरी कब्जेदार म्हणून दाखल करणेचा आदेश पारित केला.
खरे तर, ज्यावेळेस महसूल
दप्तरात अज्ञान म्हणून नोंदविलेली एखादी व्यक्ती सज्ञान झाली आहे याची वर्दी
प्राप्त झाल्यानंतर, तलाठी यांनी अशा व्यक्तीकडून जरूर ते पुरावे प्राप्त करून
घेऊन स्वत:हून योग्य तो फेरफार नोंदविणे याला कायद्याची कोणतीही बाधा येत नाही.
Comments