अ.पा.क. ने शेतजमिनीची केलेली विक्री


 

.पा.. ने शेतजमिनीची केलेली विक्री 

 

वाचा : भारतीय नोंदणी कायदा, कलम १७ ; मालमत्ता हस्तांतरण कायदा १८८२ कलम ४४ ; हिंदू अज्ञानत्‍व व पालकत्‍व अधिनियम १९५६.

 

महादेवला अजय, विजय, संजय आणि संतोष अशी एकूण चार मुले होती. महादेवची पत्‍नी मयत होती. महादेव मयत झाला तेव्‍हा अजय सज्ञान होता आणि विजय, संजय आणि संतोष अज्ञान होते. महादेवच्‍या नावे असणार्‍या शेत जमिनीवर त्‍याच्‍या चारही मुलांची नावे स्‍वतंत्र हिस्‍सा करुन, वारस म्‍हणून दाखल झाली आणि अजयचे नाव त्‍याच्‍या हिस्‍स्‍याला आणि अज्ञानांच्‍या स्‍वतंत्र हिस्‍स्‍याला 'अज्ञान पालन कर्ता (अ.पा.क.)' म्‍हणून सात-बारावर दाखल झाले.    

कालांतराने सात-बारा पुनर्लेखनाच्‍या वेळी अजयच्‍या नावासमोर 'अ.पा.क.' लिहिण्‍याचे राहून गेले आणि अजयचे नाव सात-बारा सदरी मालक म्‍हणून असल्‍याचे दिसू लागले. या गोष्‍टीचा फायदा घेत काही दिवसांनी अजयने तुकाराम यांस सदर जमिनीच्‍या संपूर्ण क्षेत्राची विक्री केली.

या व्यवहाराची कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर तलाठी यांनी गाव नमुना ६ मध्ये त्याची नोंद घेतली. सर्व हितसंबंधीतांना नोटीस बजावली. तलाठी भाऊसाहेबांनी सर्व हितसंबंधीत हजर राहिल्यानंतर त्या सर्वांची संमतीदर्शक स्वाक्षरी नोटीस पुस्तकावर घेतली.

मुदत कालावधी संपल्‍यानंतर मंडलअधिकारी यांनी संबंधीत फेरफारवर निर्णय देण्‍याकामी कागदपत्रे पाहिली आणि सात-बारा वरील सर्व फेरफार घेऊन येण्‍यास तलाठी भाऊसाहेबांना सांगितले.

तलाठी भाऊसाहेब संबंधित सर्व फेरफार घेऊन आले आणि त्‍यांनी मंडलअधिकार्‍यांना ते फेरफार मागवण्‍याचे कारण विचारले.

मंडलअधिकार्‍यांनी अजयचे नाव ज्या फेरफारने अ.पा.क. म्हणून दाखल झाले होते तो फेरफार दाखवत तलाठी भाऊसाहेबांना सांगितले की,

'आज जरी सात-बारा सदरी एकट्‍या अजयचे नाव दिसत असले तरी ती सात-बारा पुनर्लेखनाच्‍या वेळी झालेली चूक आहे. पुनर्लेखनाच्‍या वेळी अजयच्‍या नावासमोर 'अ.पा.क.' लिहिण्‍याचे राहून गेले आणि ही गोष्‍ट कोणाच्‍याच लक्षात आली नाही. या फेरफारवरुन असे दिसते की ही जमीन मूळत: महादेवची आहे आणि तो मयत झाल्‍यानंतर अजय आणि त्‍यांच्‍या तीन भावांची नावे वारस म्‍हणून दाखल झाली. त्‍यावेळी अजय सज्ञान असल्‍यामुळे त्‍याचे नाव सात-बारावर दाखल झाले असले तरी या जमिनीवर चारही भावांचा वारसाधिकार आहे.

हिंदू अज्ञानत्‍व व पालकत्‍व अधिनियम १९५६, कलम ६, ८ आणि १२ अन्‍वये 'अज्ञान पालन कर्ता' व्‍यक्‍तीला अज्ञानाच्‍या स्‍वतंत्र हिस्‍स्‍यासह संपूर्ण क्षेत्र विकण्‍याचा अधिकार नाही. त्‍यासाठी सक्षम न्‍यायालयाची परवानगी आवश्‍यक आहे. जर या मिळकतीचे स्‍वतंत्र वाटप झाले नसते तर अजयला अशा परवानगीची आवश्‍यकता नव्‍हती. (ए.आय.आर.१९९६/एस.सी. २३७१, नारायण बाळ वि. श्रीधर सुतार) फक्‍त एकत्र कुटुंबाच्या, काही कायदेशीर गरजांसाठी जमीनीची विक्री करता येते आणि अशा व्‍यवहाराच्‍या दस्तात तसा स्पष्ट उल्लेख असणे आवश्‍यक असते. दस्तात तसा स्पष्ट उल्लेख नसल्यास अ.पा.क. ला फक्‍त स्वत:च्या हिश्श्यापुरती जमीन विकण्याचा हक्क प्राप्‍त होतो.  

F 'अज्ञान पालन कर्ता' व्‍यक्‍तीला फक्त खालील कारणांसाठीच एकत्र कुटुंबाची मिळकत विकता येते अथवा गहाण ठेवता येते. या कारणांसाठी केलेले हस्तांतरण सहहिस्सेदारांवर बंधनकारक असते.

() सरकारी कर किंवा कुटुंबावर असलेले कर्ज फेडण्यासाठी

() सहहिस्सेदार किंवा कुंटुंबीयांच्या पोटपाण्यासाठी किंवा आजारपणासाठी

() सह-हक्कदार किंवा सह-हिस्सेदाराच्या किंवा त्यांच्या मुलीच्या लग्नाच्या खर्चासाठी

() जरुरीचे कौटुंबिक अंत्यविधी संस्कार, श्राध्द किंव कौटुंबीक समारंभ खर्चासाठी

() एकत्र कुटुंबासाठी मालमत्ता मिळविण्यासाठी किंवा ती टिकविण्यासाठी होणारा खर्च भागविण्यासाठी

() एकत्र कुटुंबाच्या कर्त्यावर किंवा इतर सभासदांवर गंभीर फौजदारी तोहमत झाली असेल तर त्यांच्या संरक्षणासाठी करावा लागणारा खर्च भागविण्यासाठी

() एकत्र कुटुंबाच्या व्यवसायासाठी काढलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी

() एकत्र कुटुंबाच्या इतर जरुरीच्या कारणांसाठी

उपरोक्‍त कायदेशीर गरज केवळ खरेदीपत्राच्या मजकुरावरुन सिध्द होत नाही. त्यासाठी इतर सुसंगत पुरावा सुध्‍दा द्यावा लागतो. असा व्यवहार जर उपरोक्त कायदेशीर गरजांसाठी होत नसेल तर सहवारसदार मनाई हुकूमाचा दावा दाखल करु शकतात.    

[अ.पा.क.च्‍या मिळकतीची विक्री, न्‍यायालयाच्‍या पूर्व परवानगी शिवाय होऊ शकत नाही.- (सर्वोच्‍च न्‍यायालयाचा दिनांक २५.११.२०१३ रोजी, सरोज विरूध्‍द सुंदरसिंग व इतर)]

अज्ञान व्‍यक्‍ती सज्ञान झाल्‍यावर फेरफार नोंद न घालता वर्दीवरून अज्ञानाच्‍या पालकाचे नाव कमी करता येते तथापि, यासाठीही फेरफार घालणे सुरक्षीत राहील. एकत्र कुटुंबाची मिळकत किंवा ज्या मिळकतीत मुलांचा किंवा मुलांच्या मुलांचा हिस्सा आहे अशी एकत्र कुटुंबाची मिळकत विकण्याचा, गहाण देण्याचा विशेषाधिकार फक्‍त वडिलांना आहे. पूर्वीचे नैतिक व कायदेशीर कारणासाठी घेतलेले कर्ज फेडण्यासाठीही अशी मिळकत विकण्याचा, गहाण देण्याचा विशेषाधिकार वडिलांना आहे.

त्‍यामुळे ही फेरफार नोंद फक्‍त अजयच्‍या हिस्‍स्‍यापुरतीच मंजूर करावी लागेल.'


Comments

Archive

Contact Form

Send