स्वत:च्या हिस्‍स्‍याच्‍या क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्राची विक्री


 

स्वत:च्या हिस्‍स्‍याच्‍या क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्राची विक्री

 

वाचा : भारतीय नोंदणी कायदा, कलम १७ ; महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १४९ व १५० ; मालमत्ता हस्तांतरण कायदा १८८२, कलम ५४.

 

गावात एकूण सहा एकर क्षेत्र असलेल्या एका शेतजमिनीत, संजय, अजय, आणि विजय या तीन भावांचा प्रत्येकी दोन एकर हिस्सा होता. संजयने सदर जमिनीच्‍या एकूण क्षेत्रातील तीन एकर क्षेत्र महादेवला नोंदणीकृत दस्ताने विकले. या व्यवहाराची कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर तलाठी यांनी गाव नमुना ६ मध्ये त्याची नोंद घेतली. सर्व हितसंबंधीतांना नोटीस बजावली. नोटीस मिळाल्यावर अजय, आणि विजय तलाठी भाऊसाहेबांकडे गेले आणि संजयने, त्‍याच्‍या हिस्‍स्‍याच्‍या क्षेत्रापेक्षा जास्‍त क्षेत्राची विक्री महादेवला केली आहे त्‍यामुळे ही नोंद मंजूर करु नये अशी लेखी विनंती केली.

मंडलअधिकारी चावडीला भेट देण्यास आले तेव्हा तलाठी यांनी ही तक्रार त्यांच्‍या निदर्शनास आणली.

 

सुनावणीच्या दिवशी मंडलअधिकारी यांनी महादेव तसेच संजय, अजय आणि विजय यांचे म्हणणे ऐकून घेतले, सर्वांचे जबाब घेतले आणि त्यांनी सादर केलेल्या पुराव्यांचे अवलोकन केले.

संजयचे म्हणणे होते की, तो सदर जमिनीमध्‍ये तीन एकर क्षेत्र वहिवाटत होता त्‍यामुळे त्‍या क्षेत्राची विक्री त्‍याने महादेवला केली आहे.

अजय आणि विजय यांचे म्हणणे होते की, संजय जरी सदर जमिनीमध्‍ये तीन एकर क्षेत्र वहिवाटत होता तरी त्‍या तीन एकर पैकी एक एकर क्षेत्र अजयच्‍या मालकीचे होते. आजारपणामुळे अजयला मोठे क्षेत्र वहिवाटणे शक्‍य होत नव्‍हते, त्‍यामुळे त्‍याने ते संजयला वहिवाटण्‍यापुरते दिले होते. संजयने त्‍याच्‍या हिस्‍स्‍याच्‍या क्षेत्रापेक्षा जास्‍त क्षेत्राची विक्री महादेवला केली आहे त्‍यामुळे ही नोंद मंजूर रद्‍द करावी.

महादेवचे म्हणणे होते की, त्‍याने खरेदी क्षेत्राची किंमत मोजली आहे त्‍यामुळे त्‍याचे नाव सात-बाराला नोंदवले जावे.

सर्व प्रकार मंडलअधिकारी यांच्‍या लक्षात आला.

मालमत्ता हस्तांतरण कायदा १८८२, कलम ५४ अन्वये 'विक्री' ची व्‍याख्‍या दिलेली आहे. त्‍यातील खुलास्‍यानुसार विक्रेता हा फक्‍त स्‍वत:च्‍या मालकी हक्‍काच्‍या वस्‍तूंचीच विक्री करू शकतो हे स्‍पष्‍ट होते. अशा प्रकारच्‍या व्‍यवहाराची नोंद रद्‍द केल्‍यास, खरेदी घेणार याच्‍यावर अन्‍याय केल्‍यासारखे होते शिवाय कायदेशीरपणे नोंदणीकृत असलेल्‍या दस्‍ताची नोंद करणे आवश्‍यक आहे.

एखाद्या इसमाने स्वत:च्या मालकीच्‍या हिस्‍स्‍याच्‍या क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्राची विक्री केली असली तरी

खरेदी देणार यांच्या मालकीच्या/हक्काच्या क्षेत्रापुरतीच नोंद प्रमाणीत करता येते.

खरेदी देणार याने, स्वत:च्या मालकीच्‍या हिस्‍स्‍याच्‍या क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्राची विक्री केली म्‍हणून खरेदी घेणार याने खरेदी देणार याचे विरुध्‍द फसवणूकीचा फौजदारी गुन्‍हा दाखल करावा किंवा दिवाणी न्‍यायालयात दाद मागावी.

मंडलअधिकारी यांनी वरील बाबींचा सविस्तर उल्लेख निकालपत्रात केला आणि सदर शेतजमिनीत संजयच्‍या मालकी/हिस्‍स्‍याच्‍या क्षेत्रापुरती नोंद प्रमाणीत करून त्‍या क्षेत्रावर महादेवचे नाव लावण्‍याबाबत निर्देश दिले.


Comments

Archive

Contact Form

Send