प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राची खरेदी


 

प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राची खरेदी

 

वाचा : महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १४९ व १५० ; तुकडेबंदी-तुकडेजोड व एकत्रीकरण कायदा, १९४७ कलम ८.

 

विश्‍वासने संदेशकडून, त्‍याच्‍या शेतजमिनीतील क्षेत्रापैकी तीन आर (गुंठे) क्षेत्र खरेदी केले. या व्यवहाराची कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर तलाठी यांनी गाव नमुना ६ मध्ये त्याची नोंद घेतली. सर्व हितसंबंधीतांना नोटीस बजावली. तलाठी भाऊसाहेबांनी सर्व हितसंबंधीत हजर राहिल्यानंतर त्या सर्वांची संमतीदर्शक स्वाक्षरी नोटीस पुस्तकावर घेतली.

 

मुदत कालावधी संपल्‍यानंतर मंडलअधिकारी यांनी संबंधीत फेरफारवर "खरेदी केलेल्या जमिनीचे क्षेत्र प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी असल्याने सदर व्यवहार हा तुकडेबंदी-तुकडेजोड व एकत्रीकरण कायदा, १९४७ कलम ८ च्या तरतुदींचा भंग करणारा आहे. त्यामुळे सदर नोंद रद्द करण्‍यात येत आहे. खरेदी घेणार विश्‍वासचे नाव इतर हक्कातठेवावे"  असा शेरा लिहिला.

ही माहिती कळल्‍यानंतर विश्‍वास आणि संदेश दोघे रागात मंडलअधिकार्‍याकडे आले आणि फेरफार नोंद रद्‍द केल्‍याबाबत जाब विचारु लागले.

मंडलअधिकारी यांनी त्‍यांना बसायला सांगितले आणि समजवून सांगितले की,

'भारत हा शेतीप्रधान देश असल्‍याने भारताची अर्थव्‍यवस्‍था शेतीवर अवलंबून आहे. तथापि, इतर देशांच्‍या तुलनेत, भारतातील शेत जमिनींतून मिळणारे दर एकरी उत्‍पादन फारच कमी आहे. याचे प्रमुख कारण शेत जमिनींचे झालेले छोटे-छोटे तुकडे हे आहे. शेतजमिनीच्‍या छोट्‍या तुकड्‍यात शेतीचे काम करणे अवघड जाते, व तुलनेने उत्‍पादन फारच कमी मिळते. त्‍यामुळे सन १९४७ मध्‍ये शासनाने     

तुकडेबंदी-तुकडेजोड व एकत्रीकरण कायदा, १९४७ अंमलात आणला आणि त्‍याच्‍या कलम ८ अन्‍वये सर्व प्रकारच्‍या जमिनींचे प्रमाणभूत क्षेत्र ठरवून दिले. या प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी शेतजमीन कोणालाही खरेदी करता येत नाही.   

F शेतजमिनीचे खालील प्रकार असतात:

P वरकस जमीन: भातशेतीच्या लागवडीमध्ये राबखताच्या कामासाठी उपयोगात आणल्‍या जाणार्‍या जमिनीचे प्रमाणभूत क्षेत्र उपरोक्‍त कायद्‍यान्‍वये २० गुंठे ठरविले आहे.

P कोरडवाहू जमीन: निव्वळ पावसावर अवलंबून असणार्‍या जमिनीचे प्रमाणभूत क्षेत्र उपरोक्‍त कायद्‍यान्‍वये १५ गुंठे ठरविले आहे.

P वाडी जमीन: नारळ, पोफळी झाडे लावण्‍यासाठी वापरण्‍यात येणार्‍या जमिनीचे प्रमाणभूत क्षेत्र उपरोक्‍त कायद्‍यान्‍वये ०५ गुंठे ठरविले आहे.

P विहिर बागायती जमीन: विहिरीच्‍या पाण्‍याने लागवडीखालील असलेल्‍या बागायती जमिनीचे प्रमाणभूत क्षेत्र उपरोक्‍त कायद्‍यान्‍वये २० गुंठे ठरविले आहे.
P कॅनॉल (पाट) बागायती जमीन: पाटाच्‍या पाण्‍याने लागवडीखालील असलेल्‍या बागायती जमिनीचे प्रमाणभूत क्षेत्र उपरोक्‍त कायद्‍यान्‍वये १० गुंठे ठरविले आहे.

 

विश्‍वासने खरेदी केलेले क्षेत्र उपरोक्‍त कायद्‍यान्‍वये ठरविलेल्‍या प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी असल्‍याने त्‍याची  फेरफार नोंद रद्‍द केली आहे. तथापि, तुम्‍ही नोंदणीकृत खरेदी दस्‍त केला आहे आणि संदेशने सदर क्षेत्राची विक्री परत दुसर्‍याला करु नये यासाठीइतर हक्कातसदर व्यवहाराचा शेरा ठेवला आहे.

उपरोक्‍त कायद्‍याच्‍या कलम ७ अन्‍वये असा प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी असणारा तुकडा राज्‍य शासन किंवा जमीन गहाण घेणार्‍या बँकेकडे किंवा सहकारी संस्‍थेकडे हस्‍तांतरीत करता येईल किंवा त्‍यांच्‍याकडे गहाण ठेवता येईल अथवा लगतच्‍या खातेदाराकडे हस्‍तांतरीत करता येईल किंवा त्‍याला भाडेपट्‍ट्‍याने देता येईल.'

हे ऐकून विश्‍वास आणि संदेशचा गैरसमज दूर झाला.    

Comments

Archive

Contact Form

Send