खरेदी देणार मयत
खरेदी देणार मयत
वाचा : भारतीय नोंदणी कायदा, कलम १७ ; मालमत्ता हस्तांतरण कायदा १८८२ कलम ५४ ; हिंदू वारस कायदे.
विठ्ठलने त्याची स्वकष्टार्जित
शेतजमीन नामदेवला विकत दिली. या व्यवहाराची कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर तलाठी यांनी
गाव नमुना ६ मध्ये त्याची नोंद घेतली. सर्व हितसंबंधीतांना नोटीस बजावली.
नोटीसची मुदत संपण्यापूर्वीच विठ्ठल
मयत झाला. तलाठी भाऊसाहेब अनुभवी होते, त्यांनी विठ्ठलच्या घरी निरोप पाठवून
वारसासंबंधी कागदपत्रे प्राप्त करुन घेतली. गाव नमुना ६ क (वारस नोंदवही) मध्ये वारस नोंद नोंदवली.
स्थानिक चौकशी केली आणि वारस ठराव मंजूर झाल्यावर त्या वारसांची नोंद गाव नमुना ६ मध्ये
नोंदवली. त्यानंतर विठ्ठलने केलेल्या विक्री व्यवहाराची नोटीस सर्व वारसांना बजावली.
विठ्ठलचा मुलगा किसन, तलाठी
भाऊसाहेबांकडे आला आणि त्याने सदर व्यवहारावर लेखी हरकत दाखल केली की, शेतजमिनीची
विक्री करणारी व्यक्ती मयत झाली आहे त्यामुळे झालेला दस्त आपोआपच रद्द झाला आहे. त्यामुळे संबंधित
फेरफार रद्द करावा.
तलाठी भाऊसाहेबांनी किसनला तक्रारीची
पोहोच नमुना १० मध्ये दिली. त्यानंतर ती तक्रार गाव नमुना ६-अ मध्ये नोंदवली. मंडलअधिकारी चावडीला भेट
देण्यास आले तेव्हा तलाठी यांनी ही तक्रार त्यांच्या निदर्शनास आणली.
सुनावणीच्या दिवशी किसनने त्याचे म्हणणे
मांडले की, माझ्या वडीलांनी घरातील लोकांना आम्हाला न विचारता सदर जमीन विकली होती. आता आमची या विक्रीला हरकत
आहे.
माझ्या वडीलांना काही कळत नव्हते. त्यांना फसवून/दारुच्या नशेत त्यांच्या सह्या घेतल्या गेल्या आहेत. जमिनीत आमचाही हिस्सा आहे. या विक्रीला आमची संमती नव्हती. विक्री करणारी व्यक्ती मयत
आहे त्यामुळे झालेला दस्त आपोआपच रद्द झाला आहे.
त्यामुळे संबंधित फेरफार रद्द
करावा.
नामदेवने त्याचे म्हणणे मांडले की,
मी व्यवहाराचे संपूर्ण पैसे दिलेले आहेत, त्यामुळे माझ्या नावावर जमीन झालीच
पाहिजे.
मंडलअधिकारी
सर्व हितसंबंधीतांचे म्हणणे नोंदवले आणि खालील आशयाचा कायदेशीर निकाल दिला,
"मयत विठ्ठल आणि
नामदेव यांच्यात झालेला व्यवहार हा नोंदणीकृत दस्ताने झालेला आहे. दस्त नोंदणीच्या
तारखेस खरेदी देणार हयात होते. हक्काची नोंद ही दस्तावर आधारीत असते, खरेदी देणार
मयत झाल्यामुळे त्यात फरक पडत नाही.
व्यवहाराशी संबंधित मिळकत ही मयत
विठ्ठलची स्वकष्टार्जित मिळकत होती त्यामुळे त्याने तिची विक्री करण्यापूर्वी
कोणाची संमती घेण्याचा प्रश्न नव्हता. मयत विठ्ठलला फसवून/दारुच्या नशेत
त्यांच्या सह्या घेतल्या गेल्या आहेत अशी तक्रारदाराची तक्रार असल्यास त्यांनी
सक्षम न्यायालयात त्याबाबत दाद मागावी. मयत विठ्ठलच्या वारसांनी त्यांचा हक्क दिवाणी
न्यायालयातुन शाबीत करून घ्यावा. नोंद प्रमाणित करण्यात येत आहे."
Comments