मिळकत पत्रिका
४४.
मिळकत पत्रिका :
वाचा : महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १२६, ; महाराष्ट्र जमीन महसूल (गाव, शहर आणि शहर सर्वेक्षण) नियम, १९६९
शंकरराव एकदा तलाठी कार्यालयात आले
आणि त्यांनी तलाठी भाऊसाहेबांना विचारले की, शहरात त्यांच्या मित्राचा फ्लॅट
आहे. त्याचा सात-बारा उतारा कोठे मिळेल?
तलाठी भाऊसाहेबांनी शंकररावांना
सांगितले की, मोठी गावे, नगरपालिका, महानगरपालिका क्षेत्र,
सिटी सर्व्हे योजना लागू झालेले गावठाण
क्षेत्र या ठिकाणी सात-बारा उतारा नसतो.
नगर भूमापन कार्यालय अशा प्रत्येक मिळकतीचे
स्वतंत्र पत्रक तयार करते त्याला 'सिटी सर्व्हेचा उतारा' किंवा 'मिळकत पत्रिकेचा उतारा' किंवा
'Property Card' म्हणतात. या उतार्यावर खालील माहिती असते.
* सिटी सर्वे क्रमांक, फायनल प्लॉट क्रमांक, सार्याची रक्कम.
* मिळकतीचे चौरस मीटर मध्ये क्षेत्रफळ.
* वहिवाटीचे हक्क.
* धारण करणार्याचे नाव व त्यास हक्क
कसा प्राप्त झाला.
* पट्टेदाराचे नाव (असल्यास).
* मिळकतीवरील बोजे (असल्यास).
* वेळोवेळी मिळकतीच्या मालकी हक्कात झालेल्या
बदलांची माहिती.
मिळकतीच्या
मालकी हक्कात (Ownership) बदल झाल्यास
इंग्रजीत "H' (Holder) असे अक्षर
तर मराठीत ‘धा’ (धारक) असे अक्षर लिहितात.
पट्टेदाराच्या हक्कात (Lease Holder) बदल झाल्यास इंग्रजीत "L' (Lease Holder) असे अक्षर तर मराठीत
‘प’
(पट्टेदार)
असे अक्षर लिहितात.
इतर हक्कात (Other rights) बदल झाल्यास इंग्रजीत "O' (Other rights ) असे अक्षर तर मराठीत ‘इ’ (इतर हक्क) असे अक्षर लिहितात.
मिळकतीच्या मालकी हक्कात हस्तांतरण, वारस हक्क, न्यायालयीन आदेश यांमुळे
बदल झाल्यास नगर भूमापन कार्यालयास मिळकत पत्रात बदल करण्याबाबत ९० दिवसांत, संबंधित कागदपत्रांसह कळवावे
लागते.
तलाठी भाऊसाहेबांनी, शंकररावांना फार
महत्वाचा फरक समजावून सांगितला.
Comments