खरेदीचे पूर्ण पैसे दिलेले नाहीत.
खरेदीचे
पूर्ण पैसे दिलेले नाहीत
वाचा : भारतीय नोंदणी कायदा, कलम १७ ; महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १४९ व १५० ; मालमत्ता हस्तांतरण कायदा १८८२, कलम ५४.
रामभाऊने स्वत:च्या मालकी हक्काची जमीन शंकरला नोंदणीकृत दस्ताने विकली. या व्यवहाराची कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर तलाठी यांनी सर्व हितसंबंधीतांना नोटीस बजावली. नोटीस मिळाल्यावर रामभाऊ तलाठी भाऊसाहेबांकडे गेले आणि त्यांनी तक्रार केली की शंकरने झालेल्या व्यवहाराचे पूर्ण पैसे मला अद्याप दिलेले नाहीत त्यामुळे ही नोंद मंजूर करु नये.
तलाठी भाऊसाहेबांनी रामभाऊची तक्रार स्विकारून त्यांना त्याबाबत नमुना १० मध्ये पोहोच दिली. त्यानंतर रामभाऊंची तक्रार गाव नमुना ६-अ मध्ये (विवादग्रस्त प्रकरणांची नोंदवही) नोंदवली. मंडलअधिकारी चावडीला भेट देण्यास आले तेव्हा तलाठी यांनी ही तक्रार त्यांच्या निदर्शनास आणली. मंडलअधिकारी यांनी नमुना १२ मध्ये सर्व हितसंबंधीतांना नोटीस देऊन पंधरा दिवसानंतर सर्वांना त्याच चावडीत, पुराव्याच्या कागदपत्रांसह हजर ठेवण्याचे निर्देश तलाठी यांना दिले.
सुनावणीच्या दिवशी मंडलअधिकारी यांनी रामभाऊ व शंकरचे म्हणणे ऐकून घेतले, दोघांचे जबाब घेतले आणि दोघांनी सादर केलेल्या पुराव्यांचे अवलोकन केले.
शंकरने सादर केलेल्या बँक पासबुकावरून मंडलअधिकारी यांना लक्षात आले की, रामभाऊच्या तक्रारीमध्ये तथ्य नाही. जमीन खरेदीचे सर्व पैसे रामभाऊला मिळालेले आहेत परंतु व्यवहार झाल्यानंतर गावातील काही लोकांशी चर्चा करतांना, रामभाऊचा समज झाला की आपण शंकरला कमी पैशात जमीन विकली आहे. साधारणपणे व्यवहाराचे सर्व पैसे मिळाल्याशिवाय कोणीही खरेदीदस्त नोंदणीकृत करण्याकामी स्वाक्षरीसाठी जात नाही. शंकर कडून जास्त पैसा उकळण्यासाठी, त्याला त्रास देण्याच्या उद्दशाने रामभाऊने खोटी तक्रार केली आहे.
मंडलअधिकारी यांनी वरील बाबींचा सविस्तर उल्लेख निकालपत्रात करुन रामभाऊच्या तक्रारीमध्ये तथ्य नसल्याचे नमूद करून रामभाऊंची तक्रार फेटाळली आणि संबंधीत फेरफार प्रमाणित केला.
Comments