जमीन संपादन झालेल्या व्यक्तीच्या वारसाने शेतजमीन खरेदी करणे
२५. जमीन संपादन झालेल्या व्यक्तीच्या वारसाने शेतजमीन खरेदी करणे.
वाचा : महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, कलम ६३.
महादेव नावाच्या इसमाने शेतजमीन
खरेदी केली. सदर व्यवहाराची नोंदणीकृत कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर तलाठी यांनी गाव
नमुना ६ मध्ये त्याची नोंद घेतली. सर्व हितसंबंधीतांना नोटीस बजावली.
महादेव हजर राहिल्यानंतर तलाठी
भाऊसाहेबांनी त्याच्याकडे शेतकरी पुराव्याची मागणी केली. महादेवने संपादन
अधिकार्याचा दाखला सादर केला. त्यावरुन महादेवच्या वडिलांची शेतजमीन ८
वर्षापूर्वी सार्वजनिक कामासाठी संपादित झाली होती असे कळले. परंतु तलाठी
भाऊसाहेबांनी त्याच्याकडे शेतकरी पुराव्याचाच आग्रह धरला.
योगायोगाने मंडलअधिकारी त्याच वेळेस
चावडीला भेट देण्यास आले. तलाठी यांनी ही बाब त्यांच्या निदर्शनास आणली.
मंडल अधिकारी म्हणाले, 'एखाद्या व्यक्तीची
जमीन सार्वजनिक कामासाठी संपादित झाली असेल तर महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम
कलम ६३ अन्वये त्याला, अशा संपादनासाठी त्याच्या जमिनीचा कब्जा घेतल्याच्या तारखेपासून
१० वर्षेपर्यंत ती व्यक्ती शेतकरी असल्याचे मानण्यात येते. या कलमात दिनांक
२७.५.२०१४ च्या शासन राजपत्रानुसार, उपरोक्त व्यक्तीच्या वारसांनाही शेतकरी असल्याचे
मानण्यात यावे अशी सुधारणा केली आहे. त्यानुसार महादेवने सादर केलेला संपादन
अधिकार्याचा दाखला शेतकरी पुरावा म्हणून ग्राह्य मानावा लागेल.'
Comments