अर्जावरुन नोंद
३५.
अर्जावरुन नोंद :
कायदा : फक्त अर्जावरुन नोंद करणेबाबत कोणतीही कायदेशीर तरतुद नाही.
एक दिवस तलाठी भाऊसाहेबांकडे भिमरावांनी
अर्ज केला की, भूमापन क्रमांक xx वर आमचा कब्जा आहे म्हणून कब्जेदार सदरी नोंद करावी.
अशोकरावांनी अर्ज केला की, माझ्या जमिनीवर माझ्या पत्नीच्या आणि मुलाच्या नावाची
नोंद करावी.
तलाठी भाऊसाहेबांनी मागचे काही
फेरफार बघितले तर त्यांना आढळले की, पूर्वी काही नोंदी अर्जावरून पंचनामा करून
झालेल्या आहेत. काही मंडलअधिकार्यांनीही ‘अर्ज व पंचनाम्यावरून नोंद मंजूर’
असा शेरा ठेऊन नोंदी प्रमाणित केल्या
आहेत.
तलाठी भाऊसाहेब गोंधळात पडले. मंडलअधिकारी
आल्याबरोबर तलाठी भाऊसाहेबांनी त्यांना प्रश्न विचारला की, अर्जावरुन नोंद करण्याबाबत
कोणती कायदेशीर तरतुद आहे?
मंडलअधिकार्यांना या प्रश्नाचे आश्चर्य
वाटले. तलाठी भाऊसाहेबांनी त्यांना पूर्वीच्या काही अर्जावरून पंचनामा करून
झालेल्या नोंदी आणि काही मंडलअधिकार्यांनी ‘अर्ज व पंचनाम्यावरून नोंद मंजूर’
असा शेरा ठेऊन नोंदी प्रमाणित केलेल्या
नोंदी दाखवल्या.
मंडलअधिकारी म्हणाले,
"दुर्दैवाने असे
प्रकार पूर्वी घडले आहेत हे खरे असले तरी ही पध्दत चुकीची आणि बेकायदेशीर आहे. मालमत्ता हस्तांतरण
कायद्यान्वये कायदेशीर दस्त निर्माण झाल्याशिवाय कोणताही मालकी हक्क निर्माण होत नाही.
त्यामुळे असे फेरफार नोंदवणे, सात-बारा सदरी कब्जेहक्कांत अशा अर्जांन्वये बदल
करणे अवैध आहे.
कायदेशीर नोंदणीकृत दस्त, वारस तरतुदी
आणि न्यायालय किंवा वरिष्ठांचे आदेश याशिवाय अन्य कोणत्याही कारणांमुळे अधिकार अभिलेखात
बदल होत नाहीत.
‘मिळकतीचा ताबा
हा मिळकतीच्या मालकीनंतरच आला पाहिजे.’
हे कायद्याचे तत्व आहे. भारतीय नोंदणी
कायदा, कलम
१७ अन्वये, रुपये १००/- पेक्षा जास्त किंमतीच्या मालमत्तेचा व्यवहार हा नोंदणीकृतच असणे
बंधनकारक आहे.
जरी तलाठी यांनी,
अनावधानाने, कायद्याच्या अज्ञानामुळे, फक्त अर्जावरून अशा प्रकारची नोंद गाव नमुना
६ मध्ये नोंदवली असली तर मंडलअधिकारी यांनी उपरोक्त प्रकारच्या अर्जास ‘आपण कोणताही
नोंदणीकृत दस्त सादर केला नाही तसेच फक्त अर्जावरुन अधिकार अभिलेखात बदल करण्याची तरतूद
कायद्यात नाही.' असे उत्तर देऊन नोंद रद्द करावी किंवा ‘अर्जदाराने कोणताही
नोंदणीकृत दस्त सादर केला नाही. फक्त अर्जावरुन अधिकार अभिलेखात बदल करण्याची तरतूद
कायद्यात नाही.' असा शेरा ठेऊन अशी नोंद रद्द करावी."
तलाठी भाऊसाहेबांच्या शंकांना समाधानकारक उत्तरे मिळाली.
Comments