कन्येचा राहत्या घरासंबंधी वारसाधिकार
४७.
कन्येचा राहत्या घरासंबंधी वारसाधिकार :
वाचा : हिंदू वारसा कायदा १९५६, कलम २३ ; महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १४९ व १५०.
सिताराम हे गावातील खातेदार मृत्यूपत्र
न करता मयत झाले. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या सर्व मिळकतीचे
कुटुंबियांमध्ये कायदेशीर नोंदणीकृत वाटप करण्यात आले. मयत सितारामला विधवा कन्या
मयत सितारामच्या घरातच रहात होती. वाटपामध्ये मयत सितारामच्या विधवा कन्येला
तिच्या हिस्स्यासह मयत सितारामच्या घरात रहाण्याचा हक्क देण्यात आला होता.
सदर नोंदणीकृत वाटपाची कागदपत्रे प्राप्त
झाल्यानंतर तलाठी यांनी गाव नमुना ६ मध्ये त्याची नोंद घेतली. सर्व हितसंबंधीतांना नोटीस
बजावली.
नोटीस मिळाल्यावर मयत सितारामची सुन तलाठी
यांच्याकडे सदर वाटप नोंदीविरूध्द तोंडी हरकत घेऊन आली.
योगायोगाने मंडलअधिकारी तलाठी
चावडीतच होते. त्यांनी तिच्याकडे चौकशी केली असता, तिने सांगितले की, मयत
सितारामच्या विधवा कन्येला जो मयत सितारामच्या घरात रहाण्याचा हक्क देण्यात
आला आहे त्या विरूध्द तिची तक्रार आहे. सितारामच्या मृत्यूनंतर झालेल्या
मिळकतीच्या वाटपात तिला तिचा हिस्सा मिळाला आहे त्यामुळे आता तिला या घरात
रहाण्याचा काहीही हक्क नाही. त्यामुळे या वाटपाला तिची हरकत आहे.
मंडलअधिकारी यांनी लगेच, हिंदू उत्तराधिकार
अधिनियम-१९५६
चे पुस्तक मागवले आणि त्यातील कलम २३ चे मोठ्याने वाचन केले. त्यात नमूद होते
की,
'जर अकृतमृत्यूपत्र व्यक्तीला
वारसदार कन्या असेल आणि जर ती अविवाहित असेल किंवा तिच्या पतीने तिला सोडून दिले असेल
अथवा ती पतीपासून विभक्त झाली असेल किंवा ती विधवा असेल आणि ती अकृतमृत्यूपत्र व्यक्तीच्या
घरात राहत असेल तर तिला राहत्या घरात राहण्याचा अधिकार प्राप्त होईल.'
ही तरतुद वाचल्यानंतर मंडलअधिकारी
यांनी तिला सांगितले की, 'मयत सितारामच्या विधवा कन्येला तसा कायदेशीर आहे,
यानंतरही तुमची त्यावर काही हरकत असेल तर ती लेखी द्या.'
कायदेशीर तरतुद ऐकून मयत सितारामच्या सुनेला पुढे काहीच बोलता आले नाही. तिने तिथून निघून जाणे पसंत केले.
Comments