स्वतंत्र मिळकतीत मुलांचा हिस्सा
८१. स्वतंत्र मिळकतीत मुलांचा हिस्सा
:
वाचा : भारतीय वारसा कायदा १९२५, कलम २ ; हिंदू उत्तराधिकार अधिनियम-१९५६ ; महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १४९
गोपाळराव नावाचे खातेदार मयत झाले.
त्यांनी त्यांच्या हयातीत. त्यांच्या स्वकष्टार्जित, स्वतंत्र मिळकतीचे
मृत्यूपत्र, त्यांचा पुतण्या अशोकच्या नावे करुन ठेवले होते.
मयत गोपाळरावांच्या मृत्यूपत्राबाबतची
कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर तलाठी भाऊसाहेबांनी गाव नमुना सहा मध्ये त्याची
नोंद करून सर्व हितसंबंधीतांना नोटीस बजावली.
मयत गोपाळरावांच्या मुलाने या
नोंदीबाबत लेखी तक्रार दाखल केली.
तलाठी भाऊसाहेबांनी त्याला
तक्रारीची पोहोच नमुना १० मध्ये दिली. त्यानंतर ती तक्रार गाव नमुना ६-अ मध्ये नोंदवली.
मंडलअधिकारी चावडीला भेट देण्यास आले
तेव्हा तलाठी यांनी ही तक्रार त्यांच्या निदर्शनास आणली.
मंडलअधिकारी यांनी नमुना १२ मध्ये सर्व
हितसंबंधीतांना नोटीस देऊन पंधरा दिवसानंतर सर्वांना त्याच चावडीत, पुराव्याच्या कागदपत्रांसह
हजर ठेवण्याचे निर्देश तलाठी यांनी दिले.
सुनावणीच्या दिवशी मयत गोपाळरावांच्या
मुलाने म्हणणे मांडले की, मयत गोपाळरावांची मिळकत एकत्र कुटुंबाच्या पैशातून
मिळविलेली होती त्यामुळे त्यांना ती मिळकत मृत्यूपत्राने प्रदान करता येणार
नाही. त्या मिळकतीवर आमचा वारसाहक्क आहे.
अशोकने म्हणणे मांडले की, मयत गोपाळरावांची
मिळकत स्वकष्टार्जित होती. त्यामुळे तिची विल्हेवाट लावण्याचा स्वत:च्या
इच्छेप्रमाणे लावण्याचा गोपाळरावांना पूर्ण अधिकार होता.
अशोकने मयत गोपाळरावांच्या मिळकतीबाबत
सादर केलेल्या कागदपत्रांवरून, ती मिळकत मयत गोपाळरावांची स्वकष्टार्जित होती
हे सिध्द होत होते.
दोन्ही पक्षाचे म्हणणे ऐकून
मंडलअधिकार्यांनी निकाल दिला की,
'वादींना मयत गोपाळरावांची मिळकत
एकत्र कुटुंबाच्या पैशातून मिळविलेली होती असे सिध्द करता आलेले नाही. प्रतिवादींनी
सादर केलेल्या कागदपत्रांवरून, मयत गोपाळरावांची मिळकत स्वकष्टार्जित होती हे
सिध्द होत आहे. स्वकष्टार्जित मिळकतीमध्ये मुले सहदायद ठरत नाहीत (ऑल इंडिया
रिपोर्टर, २००५ (३), ८७९). स्वकष्टार्जित मिळकतीची विल्हेवाट स्वत:च्या इच्छेप्रमाणे
लावण्याचा कोणत्याही व्यक्तीला पूर्ण अधिकार असतो. वादीचा हरकत अर्ज फेटाळण्यात
येत आहे.'
Comments