स्‍वकष्‍टार्जित मिळकतीत अनौरस मुलांचा हिस्‍सा

 


८२. स्‍वकष्‍टार्जित मिळकतीत अनौरस मुलांचा हिस्‍सा :

 

वाचा : हिंदू मॅरेज ॲक्‍ट, १९५५, कलम १६; महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १४९ व १५०.

 

पुरूषोत्तम मयत झाल्‍यानंतर त्‍याच्‍या स्‍वकष्‍टार्जित मिळकतीचे वाटप करण्‍यात आले. आणि त्‍या वाटपात मयत पुरूषोत्तमच्‍या अनौरस मुलालाही हिस्‍सा देण्‍यात आला. वाटपानुसार मिळकतीवर नावे दाखल करण्‍यासाठी तलाठी कार्यालयात लेखी अर्ज, संबंधित कागदपत्रांसह सादर करण्‍यात आली.  

सदर नोंदणीकृत वाटपाची कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर तलाठी यांनी गाव नमुना ६ मध्ये त्याची नोंद घेतली. सर्व हितसंबंधीतांना नोटीस बजावली.

नोटीस मिळाल्यावर मयत पुरूषोत्तमचा मोठा औरस मुलगा अभिषेक तलाठी यांच्‍याकडे आला आणि मयत पुरूषोत्तमच्‍या अनौरस मुलाला मिळकतीत हिस्‍सा मिळण्‍याचा हक्‍क प्राप्‍त होत नाही अशी लेखी तक्रार दाखल केली. 

तलाठी भाऊसाहेबांनी त्‍याला तक्रारीची पोहोच नमुना १० मध्ये दिली. त्यानंतर ती तक्रार गाव नमुना ६-अ मध्ये नोंदवली.

 मंडलअधिकारी चावडीला भेट देण्यास आले तेव्हा तलाठी यांनी ही तक्रार त्यांच्‍या निदर्शनास आणली. मंडलअधिकारी यांनी नमुना १२ मध्ये सर्व हितसंबंधीतांना नोटीस देऊन पंधरा दिवसानंतर सर्वांना त्याच चावडीत, पुराव्याच्या कागदपत्रांसह हजर ठेवण्याचे निर्देश तलाठी यांनी दिले.

सुनावणीच्या दिवशी मंडलअधिकारी यांनी दोन्‍ही पक्षाचे म्‍हणणे नोंदवले आणि खालील आशयाचा कायदेशीर निकाल दिला,

'अनौरस मुलाला एकत्र कुटुंबातील मिळकतीत हिस्‍सा मिळण्‍याचा हक्‍क प्राप्‍त होत नाही (ए.आय.आर. १९८३, मुंबई २२२; ए.आय.आर. १९८७, मुंबई १८२; ए.आय.आर. १९९६ एस.सी. १९६३) परंतु हिंदू मॅरेज ॲक्‍ट, १९५५, कलम १६ अन्‍वये वडिलांच्‍या स्‍वकष्‍टार्जित मिळकतीत अनौरस मुलाला हिस्‍सा मिळण्‍याचा हक्‍क प्राप्‍त होतो. (ए.आय.आर. १९९६, एस.सी. १९६३) त्‍यामुळे वादीचा हरकत अर्ज फेटाळण्‍यात येत आहे.'


Comments

Archive

Contact Form

Send