आणेवारी म्‍हणजे वाटप नाही

 


८३. आणेवारी म्‍हणजे वाटप नाही :

 

वाचा : महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम ८५, १४९ व १५०.

 

गावात एका शेतजमिनीत, राजेश, विनोद आणि सुरेश या तीन भावांच्‍या नावे सात-बारा सदरी प्रत्‍येकी ५ आणे ४ पै आणेवारीने दाखल होती. त्‍यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम ८५ अन्‍वये तहसिलदारांसमोर वाटप करुन घेतले.

वाटपाची कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर तलाठी यांनी गाव नमुना ६ मध्ये त्याची नोंद घेतली. सर्व हितसंबंधीतांना नोटीस बजावली.

राजेश, विनोद आणि सुरेश सहीसाठी चावडीत आले तेव्‍हा मंडलअधिकारीही तेथे आलेले होते.

सुरेशने तक्रारीच्‍या स्‍वरात मंडल्रधिकार्‍यांना विचारणा केली की, आमच्‍या शेतजमिनीच्‍या सात-बारा सदरी आधीच प्रत्‍येकी ५ आणे ४ पै आणेवारीने दाखल आहेत. मग पुन्‍हा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम ८५ अन्‍वये वाटप करुन घ्‍यायचे कारण काय?

मंडल्रधिकार्‍यांनी खुलासा केला की, सात-बारा सदरी आणेवारीने दाखल असणे म्‍हणजे आपोआप वाटप झाले असे म्‍हणता येत नाही. अशा आणेवारीला, फारतर 'कौटुंबिक व्‍यवस्‍था' म्‍हणता येईल (ए.आय.आर. १९९२, मुंबई ७२). वाटप म्‍हणजे मिळकतीचे सरस-निरस मानाने तुकडे पाडून माप आणि सीमांकनाने (Metes & Bounds) तुकडे करणे. पूर्वी आणेवारीने तुम्‍ही आपसात 'कौटुंबिक व्‍यवस्‍था' ठरविली होती, आता कलम ८५ अन्‍वये वाटप करुन सरस-निरस मानाने, माप आणि सीमांकनाने जमिनीच्‍या हद्‍दी ठरवून घेतलेल्‍या आहेत.      

सुरेशची तक्रार दूर झाली आणि सर्वांनाच आणेवारी आणि वाटपातील फरक लक्षात आला.


Comments

Archive

Contact Form

Send