दत्तकाचा दत्तकग्रहाणापूर्वीच्‍या मिळकतीवर अधिकार

 


८७. दत्तकाचा दत्तकग्रहाणापूर्वीच्‍या मिळकतीवर अधिकार :

 

वाचा : हिंदू दत्तक व निर्वाह अधिनियम, १९५६ ; म.ज.म.अ. १९६६, कलम १४९, १५०

 

रमाकांत आणि विनिताला आपत्‍य नसल्‍याने त्‍यांनी बिपीनला दत्तक घेतले होते.

दत्तकग्रहणापूर्वीपासून बिपीनच्‍या नावे त्‍याच्‍या जनक वडिलांनी दिलेली मिळकत होती.

बिपीनचे जनक वडिल मयत झाल्‍यानंतर, त्‍यांच्‍या मिळकतीचे वाटप करण्‍यात आले. या वाटपात हिंदू दत्तक व निर्वाह अधिनियमातील तरतुदींनुसार बिपीनला काहीही हिस्‍सा देण्‍यात आला नाही परंतु दत्तकग्रहणापूर्वीपासून बिपीनच्‍या नावे त्‍याच्‍या जनक वडिलांनी दिलेली मिळकत, बिपीनच्‍या नावे तशीच ठेवण्‍यात आली.

वाटप दस्‍ताची नोंदणीकृत कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर तलाठी भाऊसाहेबांनी अर्जानुसार गाव नमुना ६ मध्‍ये त्‍याची नोंद करून सर्व हितसंबंधीतांना नोटीस बजावली.

बिपीनची सख्‍खी बहिण (बिपीनच्‍या जनक वडिलांची मुलगी) अनिता, या नोंदीविरुध्‍द तक्रार दाखल करण्‍यास चावडीत आली. योगायोगाने मंडलअधिकारी त्‍यावळेस चावडीतच होते.

मंडलअधिकार्‍यांनी तिच्‍याकडे चौकशी केली तेव्‍हा तिने सांगितले की, दत्तकग्रहणापूर्वीपासून बिपीनच्‍या नावे त्‍याच्‍या जनक वडिलांनी दिलेली मिळकत, बिपीनच्‍या वडिलांचे निधन झाल्‍यावर, झालेल्‍या वाटपात, बिपीनच्‍या नावे तशीच ठेवण्‍यात आली आहे. बिपीन दत्तक गेला आहे आणि आता त्‍याचे जनक वडिलही मयत आहेत. तेव्‍हा बिपीनचा, त्‍याच्‍या जनक वडिलांनी दिलेल्‍या मिळकतीवर हक्‍क नाही. त्‍यामुळे बिपीनच्‍या नावे असलेल्‍या मिळकतीचेही, त्‍याच्‍या जनक वडिलांच्‍या वारसांत वाटप करण्‍यात यावे किंवा बिपीनचे दत्तकग्रहण रद्‍द करण्‍यात यावे..

मंडलअधिकार्‍यांनी अनिताला सांगितले की,

हिंदू दत्तक व निर्वाह अधिनियम, १९५६, कलम १२ (ब) अन्‍वये दत्तक आपत्याला, दत्तकग्रहणापूर्वी मिळालेली मालमत्ता किंवा त्यावरील दत्तकग्रहणापूर्वीची आबंधने त्याच्याकडेच निहित राहतील आणि कलम १२ (क) अन्‍वये दत्तक आपत्‍याला, दत्तकग्रहणापूर्वी मिळालेली मालमत्ता कोणीही काढून घेऊ शकणार नाही अशी तरतूद आहे. तसेच या कायद्‍याच्‍या कलम १५ अन्‍वये कोणतेही कायदेशीर दत्तकग्रहण, दत्तकग्राही माता किंवा पित्याकडून रद्द करता येणार नाही. तसेच दत्तक आपत्यही दत्तकग्राही माता-पित्याचा त्याग करुन त्याच्या जनक घराण्यात जाऊ शकणार नाही. त्‍यामुळे तुमच्‍या दोन्‍ही विनंती कायदेबाह्‍य आहेत.

आपली कायद्‍यातील तरतुदींबाहेरील कोणतीही विनंती मान्‍य होणार नाही याची अनिताला जाणिव झाली. 

Comments

Archive

Contact Form

Send