हिबानामा
वाचा : मालमत्ता हस्तांतरण अधिनियम १८८२, कलम १२९; मुस्लिम व्यक्तीगत (पर्सनल लॉ) कायदा; नोंदणी कायदा, कलम १८ ; महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १४९, १५०.
तलाठी यांचेकडे रफीकने हिबानाम्याचा
नोंदणीकृत दस्त आणून दिला. तलाठी भाऊसाहेब नवीन होते. त्यांना हिबानामा म्हणजे नेमके
काय याचा बोध होत नव्हता.
मंडलअधिकारी आल्यानंतर तलाठी
भाऊसाहेबांनी त्यांना हिबानाम्याबाबत माहिती विचारली. मंडलअधिकारी यांनी तलाठी
भाऊसाहेबांना माहिती दिली की,
मुस्लिम कायद्यान्वये बक्षिसाला ‘हिबा’ म्हणतात. जी मुस्लिम व्यक्ती वडिलोपार्जित
स्थावर/जंगम
मालमत्ता धारण करीत असेल ती व्यक्ती, इतर सहधारकांची ‘हिबा’ साठी संमती नसली तरीही त्याची स्थावर/जंगम मिळकत ‘हिबा’ म्हणून देऊ शकेल.
रक्तसंबंधी
नात्यामध्ये केलेल्या तोंडी ‘हिबानामा’ होऊ शकतो. ‘हिबानामा’ साठी आवश्यक असलेल्या अटी म्हणजे
(१)
‘हिबा’
देणार्याची इच्छा व त्याचे प्रकटीकरण (२) ज्याला ‘हिबा’ द्यावयाचा आहे त्याची अथवा
त्याच्या वतीने दुसर्याची संमती. (३) जी मालमत्ता ‘हिबा’ द्यावयाची आहे त्या मालमत्तेचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष ताबा
दिला पाहिजे. यापैकी
एकही गोष्ट घडली नाही तर ‘हिबा’ व्यवहार अवैध ठरतो.
मुस्लिम
कायद्यांतर्गत, मुस्लिम व्यक्ती, कायदेशीरपणे, स्वत:च्या हयातीत, (inter vivos) अन्य हयात व्यक्तींला स्वत:ची संपूर्ण संपत्ती 'हिबा' मार्फत हस्तांतरीत करू शकते.
हीच संपत्ती जर त्याने मृत्युपत्राद्वारे दिली तर त्याला फक्त १/३ मिळकत देण्याचा
अधिकार प्राप्त होतो आणि मृत्युपत्राद्वारे दिलेल्या मिळकतीचे हस्तांतरण त्याच्या
मृत्युनंतरच शक्य होते, त्याच्या हयातीत नाही.
मालमत्ता हस्तांतरण अधिनियम १८८२
कलम १२२ मध्ये बक्षीस/दान ची प्रक्रिया स्पष्ट केलेली आहे. परंतु 'हिबा' या प्रकाराला कायद्यानुसार 'व्यवहार (transaction)' समजले जाते कारण मुस्लिम कायदा 'हिबा' (gift) ला
कराराच्या कायद्याचा भाग (part of
contract law) मानतो. कारण 'हिबा' साठी काही अटींची पूर्तता होणे आवश्यक
असते. 'हिबा' तोंडी किंवा लेखी असू शकेल.
मुस्लिम कायद्यान्वये
'हिबा' हा तोंडीसुध्दा असू शकतो. त्यामुळे तोंडी 'हिबा' नोंदणीकृत असावा असे
बंधन नाही.
'हिबा'चा
समावेश 'शरीयत कायदा १९३७' मध्ये करण्यात आला आहे. म्हणून 'हिबा' मुळे भारतीय
राज्यघटनेच्या कलम १४ चा भंग होत नाही.
तथापि,
दिनांक ०५ मे २०११ रोजी मा. सर्वोच्च न्यायालयाने हफीजाबीबी व
इतर वि. शेख फरीद (मयत) व इतर या प्रकरणात निकाल देतांना, परिच्छेद क्रमांक २८
मध्ये, मालमत्ता हस्तांतरण अधिनियम १८८२,
कलम १२९ च्या तरतुदीचा अर्थ अपरिहार्य
प्रतिबंध (sine
qua non) असा मानण्यात
येऊ नये असे निर्देशित केले आहे.
मालमत्ता
हस्तांतरण अधिनियम १८८२, कलम १२९ अन्वये, मालमत्ता हस्तांतरण अधिनियम १८८२ च्या
तरतुदी मुस्लिम कायद्यातील कोणत्याही तरतुदींवर परिणाम करत नाहीत अशी तरतुद
आहे. त्यामुळे लेखी 'हिबा' नोंदणीकृत असावा असे बंधन नाही.
नेहमीच्या नोंदणीकृत दस्ताप्रमाणेच हिबानाम्याचा नोंदणीकृत दस्त गाव नमुना ६ मध्ये नोंदवून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १५० अन्वये त्यावर कार्यवाही करावी.
Comments