सहकारी संस्थेतर्फे ग्रामीण क्षेत्रात असलेल्या जमिनीची खरेदी

 


८९. सहकारी संस्थेतर्फे ग्रामीण क्षेत्रात असलेल्या जमिनीची खरेदी :

 

वाचा : भारतीय नोंदणी कायदा, कलम १७ ;  महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १४९, १५० ; कुळकायदा कलम ६४-अ ; मुंबई सहकारी संस्‍था अधिनियम १९२५.

 

गुरुकृपा सहकारी संस्थेने (चेअरमनच्या नावे), नोंदणीकृत दस्ताने ग्रामीण क्षेत्रात असलेली जमीन खरेदी केली. याबाबत नोंदणीकृत कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर तलाठी यांनी गाव नमुना ६ मध्ये त्याची नोंद केली आणि सर्व हितसंबंधीतांना नोटीस बजावली.

गुरुकृपा सहकारी संस्थेचे चेअरमन हजर राहिल्यानंतर तलाठी भाऊसाहेबांनी त्यांची संमतीदर्शक स्वाक्षरी नोटीस पुस्तकावर घेतली आणि त्‍याच्‍याकडे त्‍यांचा आणि इतर सदस्‍यांचा शेतकरी पुरावा मागितला तेव्‍हा चेअरमन यांनी स्‍वत:चा शेतकरी पुरावा हजर केला परंतु इतर सदस्‍यांचा शेतकरी पुरावा नसल्‍याचे सांगितले.

तलाठी भाऊसाहेबांनी मंडलअधिकार्‍यांना मार्गदर्शन विचारले.  

मंडलअधिकार्‍यांनी सांगितले की,

कुळकायदा कलम ६४-अ अन्‍वये, खरेदीच्‍या दिवशी, मुंबई सहकारी संस्‍था अधिनियम १९२५ अन्‍वये नोंदणी झालेल्‍या संस्‍थेला अशी जमीन खरेदी करता येते. खरेदी घेणार संस्थेचे चेअरमन हे शेतकरी असल्याची पुराव्यासह खात्री करावी. परंतु जर खरेदीच्‍या दिवशी सदर संस्‍था  मुंबई सहकारी संस्‍था अधिनियम १९२५ अन्‍वये नोंदणी झालेली असावी अन्‍यथा तो व्‍यवहार शेतकरी आणि बिगर शेतकरी यांच्‍यातील बेकायदेशीर व्‍यवहार ठरेल (विनायक वि. राज्‍यशासन- एम.एल.जे.-२०११(२), ७४०).

तथापि, काही ठिकाणी अशा नोंदणीकृत संस्‍था, नोंदणीकृत दस्‍ताने शेतजमीन खरेदी करतात तेव्‍हा फक्त चेअरमन शेतकरी असतो इतर सदस्य बिगर शेतकरी असतात. काही दिवसांनी संस्था विसर्जित झाल्‍याचा अर्ज व नोटरी समक्ष केलेला संस्‍था विसर्जन दस्‍त हजर करून, फक्‍त संस्‍थेचे नाव कमी करून इतरांची नावे सात-बारा सदरी तशीच कायम ठेवण्‍याची विनंती करतात. असे केल्‍यास, सात-बारावरुन संस्‍थेचे नाव कमी होते व संस्‍थेचे बिगर शेतकरी सदस्‍य, सात-बारा सदरी नाव आल्‍याने आपोआप शेतकरी बनतात.

त्‍यामुळे संस्‍थेचा आधीचा करार नोंदणीकृत असेल तर विसर्जन करारही नोंदणीकृत असावा तसेच सर्व सदस्‍यांचे शेतकरी पुरावे घेण्‍याची दक्षता घ्‍यावी.  


Comments

Archive

Contact Form

Send