कुलमुख्‍त्‍यारपत्राची अधिकृतता

 


९०. कुलमुख्‍त्‍यारपत्राची अधिकृतता :

 

वाचा : केंद्र शासनाचा कुलमुख्‍त्‍यारपत्राचा कायदा, १८८२ ; भारतीय मुद्रांक कायदा, १८९९ कलम २(२१).    
 

 

कुलमुख्‍त्‍यारपत्राद्‍वारे होणार्‍या खरेदी- विक्री व्‍यवहारांबाबत चर्चा सुरू असतांना, तलाठी भाऊसाहेबांनी, मंडलअधिकार्‍यांना कुलमुख्‍त्‍यारपत्राच्‍या अधिकृततेबाबत माहिती देण्‍याची विनंती केली.

मंडलअधिकार्‍यांनी खुलासा केला की,

कायद्‍याला कुलमुख्‍त्‍यारपत्राचा कायदा हा केंद्र शासनाने केलेला कायदा असून तो संपूर्ण भारतात

एक मे १८८२ पासून लागू झाला.

या कायद्‍याच्‍या कलम १अ अन्‍वये " कुलमुख्‍त्‍यारपत्र" म्‍हणजे असा कोणताही दस्‍त, ज्‍याद्‍वारे एखाद्‍या विशिष्‍ठ व्‍यक्‍तीला, कुलमुख्‍त्‍यारपत्र करुन देणार्‍या व्‍यक्तीच्‍यावतीने काम करता येईल.

कलम २ अन्‍वये, आवश्‍यकता असल्‍यास कुलमुख्‍त्‍यारपत्रधारक, कोणताही दस्‍त, (कुलमुख्‍त्‍यारपत्र देणार्‍याच्‍यावतीने) त्‍याच्‍या स्‍वत:च्‍या नावाने, स्‍वाक्षरीने आणि आवश्‍यकता वाटल्‍यास स्‍वत:ची मुद्रा (own seal) उमटवून अंमलात आणू शकेल. आणि अशाप्रकारे कुलमुख्‍त्‍यारपत्रधारकाने केलेला दस्‍त कुलमुख्‍त्‍यारपत्र करुन देणार्‍या व्‍यक्तीने, स्‍वत:च्‍या स्‍वाक्षरीने आणि स्‍वत:ची मुद्रा (own seal) उमटवून केलेला आहे असे कायद्‍याने मानण्‍यात येईल. तथापि, एखादे कृत्‍य कायद्‍यानुसार स्‍वत: करणे भाग असल्‍यास या कलमाची बाधा येणार नाही. 

कुलमुख्‍त्‍यारपत्रधारकामार्फत केलेले कोणतेही कृत्‍य किंवा दिलेली रक्‍कम, करार जर सद्‍भावनेने (act in good faith) केलेले असेल तर तो कोणत्‍याही शिक्षेस पात्र ठरणार नाही. जर कुलमुख्‍त्‍यारपत्र करुन देणारी व्‍यक्‍ती जर कुलमुख्‍त्‍यारपत्रधारकामार्फत कोणतेही कृत्‍य किंवा रक्‍कम देणे/घेणे, करार करण्‍यापूर्वी मयत झाली असेल, वेडी झाली असेल, दिवाळखोर झाली असेल किंवा तिने कुलमुख्‍त्‍यारपत्र रद्‍द केले असेल आणि याची कल्‍पना कुलमुख्‍त्‍यारपत्रधारकाला खरोखरच नसेल आणि कुलमुख्‍त्‍यारपत्रधारकाने केलेले असे कृत्‍य सद्‍भावनेने (act in good faith) केलेले असेल तर तो कोणत्‍याही शिक्षेस पात्र ठरणार नाही. परंतु या कलमामुळे कुलमुख्‍त्‍यारपत्रधारकाला रक्‍कम/पैसा देणार्‍या व्‍यक्‍तीचा, दिलेल्‍या रकमेवरील हक्‍क संपतो असे नाही. कुलमुख्‍त्‍यारपत्रधारकाला रक्‍कम/पैसा देणार्‍या व्‍यक्‍तीला त्‍याची रक्‍कम परत मिळण्‍याचा कायद्‍यान्‍वये जो हक्‍क असेल तो अबाधित राहील.     

जर एखाद्‍या महिलेने तिच्‍या लग्‍नापूर्वी कोणाला मृत्युपत्रासंबंधी नसलेल्‍या कामांसाठी कुलमुख्‍त्‍यारपत्र दिले असेल तर तिच्‍या लग्‍नानंतरही ते कुलमुख्‍त्‍यारपत्र जणू तिचे लग्‍न झाले नाही असे गृहीत धरुन अंमलात राहील. 

कुलमुख्‍त्‍यारपत्रधारक खालील कामे करू शकतो:

(अ) कुलमुख्‍त्‍यारपत्रधारकाला कुलमुख्‍त्‍यारपत्र देणार्‍याच्‍यावतीने कोणताही दस्‍त, (कुलमुख्‍त्‍यारपत्र देणार्‍याच्‍यावतीने) त्‍याच्‍या स्‍वत:च्‍या नावाने, स्‍वाक्षरीने आणि आवश्‍यकता वाटल्‍यास स्‍वत:ची मुद्रा (own seal) उमटवून अंमलात आणू शकेल. परंतु कुलमुख्‍त्‍यारपत्रात नमुद अटी, शर्ती आणि अधिकाराबाहेर जाऊन काम करता येणार नाही.

(ब) कुलमुख्‍त्‍यारपत्रधारकाने अत्‍यंत प्रामाणिकपणे काम करणे अपेक्षित आहे.

(क) कुलमुख्‍त्‍यारपत्रधारकाने केलेल्‍या फसवेगिरीसाठी कुलमुख्‍त्‍यारपत्र देणार्‍याला जबाबदार ठरवता येणार नाही.

(ड) कुलमुख्‍त्‍यारपत्रान्‍वये कुलमुख्‍त्‍यारपत्रधारकाला दिलेले अधिकार त्‍याला दुसर्‍या व्‍यक्‍तीला तबदिल करता येणार नाहीत.

(इ) कुलमुख्‍त्‍यारपत्रधारकाने, कुलमुख्‍त्‍यारपत्र देणार्‍या व्‍यक्‍तीला, सोपविलेल्‍या कामाचा आणि पैशाचा हिशोब वेळोवेळी देणे आवश्‍यक आहे.   

कुलमुख्‍त्‍यारपत्र कायद्‍यात कुलमुख्‍त्‍यारपत्र कुलमुख्‍त्‍यारपत्र कधी रद्‍द होते याचा उल्‍लेख करण्‍यात आलेला नाही. तथापि, कुलमुख्‍त्‍यारपत्र देणार्‍या व्‍यक्‍तीस ते कधीही रद्‍द करण्‍याचा अधिकार आहे. अशा रद्‍दतेबाबत त्‍याने कुलमुख्‍त्‍यारपत्रधारकास कळविणे अपेक्षित आहे.

भारतीय करार कायदा, १८७२, (Indian Contract Act, 1872) कलम २०१ अन्‍वये कुलमुख्‍त्‍यारपत्र देणार्‍या व्‍यक्‍तीला कुलमुख्‍त्‍यारपत्र रद्‍द करण्‍याचा अधिकार असतो किंवा कुलमुख्‍त्‍यारपत्रधारक कुलमुख्‍त्‍यारपत्राचा त्‍याग करु शकतो.

सर्वसाधारणपणे कुलमुख्‍त्‍यारपत्रधारकावर सोपवलेले काम पूर्ण झाल्‍यावर कुलमुख्‍त्‍यारपत्र आपोआप रद्‍द ठरते. तथापि, प्रत्‍येक कुलमुख्‍त्‍यारपत्रात ते कधी रद्‍द/प्रभावहिन ठरेल याचा उल्‍लेख जरूर असावा.

कुलमुख्‍त्‍यारपत्र देणारी व्‍यक्‍ती किंवा कुलमुख्‍त्‍यारपत्रधारक मरण पावल्‍यास कुलमुख्‍त्‍यारपत्र आपोआप रद्‍द ठरते. परंतु स्‍थावर मालमत्तेत कुलमुख्‍त्‍यारपत्रधारकाचा हक्‍क/अधिकार निर्माण करणारी कुलमुख्‍त्‍यारपत्रे, कुलमुख्‍त्‍यारपत्र देणारी व्‍यक्‍ती मरण पावली तरी काम पूर्ण झाल्‍याशिवाय रद्‍द ठरत नाहीत. (उदा. सोसायटी बांधकामासाठी कुलमुख्‍त्‍यारपत्र देण्‍यात आले होते. बांधकाम सुरू असतांना कुलमुख्‍त्‍यारपत्रदेणार मयत झाला. अशा वेळेस कुलमुख्‍त्‍यारपत्र देणारा मयत झाला म्‍हणून कुलमुख्‍त्‍यारपत्र रद्‍द न होता, कुलमुख्‍त्‍यारपत्रात नमूद केल्‍यानुसार बांधमाम पूर्ण झाल्‍यावर कुलमुख्‍त्‍यारपत्र रद्‍द होईल).    

कुलमुख्‍त्‍यारपत्र देणारी व्‍यक्‍ती वेडी किंवा दिवाळखोर घोषित झाल्‍यास कुलमुख्‍त्‍यारपत्र आपोआप रद्‍द ठरते.   

कुलमुख्‍त्‍यारपत्राचे खालील प्रकार आहेत:

१) साधारण कुलमुख्‍त्‍यारपत्र [General Power of Attorney (GPA)] : सर्वसाधारण कामासाठी प्रतिनिधी नेमून त्‍याला अधिकार देणे. येथे "सर्वसाधारण" या शब्‍दाचा अर्थ 'कामाचा विषय' सामान्य असणे असा होतो, दिलेले अधिकार सर्वसाधारण आहेत असा होत नाही. जर कुलमुख्‍त्‍यारपत्राच्‍या दस्‍तात, कुलमुख्‍त्‍यारपत्रधारकावर सोपवलेले काम विशिष्‍ट असेल किंवा त्‍या कामाचा विशिष्‍टरित्‍या उल्‍लेख केलेले असेल तर ते कुलमुख्‍त्‍यारपत्र साधारण मानले जाणार नाही. त्‍याला मर्यादित कुलमुख्‍त्‍यारपत्र मानले जाईल.

२) विशेष कुलमुख्‍त्‍यारपत्र [Special Power of Attorney (SPA)] : विशिष्‍ट काम किंवा कामांसाठी दिलेल्‍या कुलमुख्‍त्‍यारपत्राला विशेष कुलमुख्‍त्‍यारपत्र म्‍हणतात.

३) शाश्‍वत कुलमुख्‍त्‍यारपत्र [Durable Power of Attorney (DPA)] : ज्‍या कुलमुख्‍त्‍यारपत्रात, कुलमुख्‍त्‍यारपत्र करून देणारी व्‍यक्‍ती जरी मानसिकदृष्‍या असमर्थ झाली तरी कुलमुख्‍त्‍यारपत्र धारकाला दिलेले अधिकार कायम राहतील असा उल्‍लेख असतो त्‍याला शाश्‍वत कुलमुख्‍त्‍यारपत्र म्‍हणतात.   

कुलमुख्‍त्‍यारपत्र एखाद्‍या स्‍थावर मालमत्तेत अधिकार निर्माण करणारे नसेल तर ते नोंदणीकृत असणे आवश्‍यक नाही. परंतु जर कुलमुख्‍त्‍यारपत्र, रुपये शंभरपेक्षा जास्‍त किंमतीच्‍या स्‍थावर मालमत्तेविषयी केलेले असेल तर ते मुद्रांक शुल्‍कासह नोंदणीकृत असणे आवश्‍यक आहे. तथापि अन्‍य प्रकारचे कुलमुख्‍त्‍यारपत्र नोटरीकडे नोंदविलेले असावे.

मिळकत विक्रीसाठी साधारण कुलमुख्‍त्‍यारपत्र पुरेसे नाही असा निकाल सुरज लँप आणि प्रा. लि. विरुध्‍द हरियाना राज्‍य व इतर या प्रकरणात सर्वोच्‍च न्‍यायालयाने दिला आहे.


Comments

Archive

Contact Form

Send