मयत हिंदु स्त्री खातेदार
मयत हिंदु स्त्री खातेदार
वाचा : हिंदू वारसा कायदा १९५६, कलम १५ ; महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १४९ व १५०.
हिराबाई ही गावातील स्त्री खातेदार मयत
झाली. तिच्या
मयत पतीचा मोठा भाऊ विश्वासराव वारसासंबंधी कागदपत्रे घेऊन तलाठी कार्यालयात आले
आणि मयत हिराबाईला अन्य कोणी वारस नसल्यामुळे त्यांचे नाव वारस सदरी लावावे म्हणून
लेखी अर्ज दिला.
तलाठी भाऊसाहेबांनी अर्जानुसार गाव नमुना
६ क मध्ये नोंद घेतली. स्थानिक चौकशी केली तेव्हा त्यांना असे कळले की, हिराबाईला
जवळचे कोणीही वारस नाही. फक्त त्याच्या मयत पतीचा भाऊ हाच एकमेव नातेवाईक आहे. मयत
पतीचा भाऊ वारस ठरेल की नाही याबाबत तलाठी भाऊसाहेब साशंक होते.
मंडलअधिकारी चावडीला भेट देण्यास आले
तेव्हा तलाठी भाऊसाहेबांनी त्यांना याबाबत प्रश्न विचारला. मंडलअधिकारी अनुभवी होते, त्यांनी यांनी तलाठी
भाऊसाहेबांची जिज्ञासा खालील प्रमाणे दूर केली. ते म्हणाले,
"हिंदू वारसा कायदा
१९५६, कलम १५ मध्ये विनामृत्युपत्र मरण पावणार्या हिंदु स्त्री खातेदाराची संपत्ती
वारसाहक्काने कशी प्रक्रांत होते याबाबत खालील प्रमाणे वर्णन केले आहे.
अ) पहिल्यांदा
मयत स्त्रिचे, मुलगे व मुली
(कोणताही मयत मुलगा किंवा मुलगी यांची
अपत्ये धरून) आणि पती यांच्याकडे
आ) दुसर्यांदा, मयत स्त्रिच्या
पतीच्या वारसाकडे
इ) तिसर्यांदा, मयत स्त्रिच्या
तिच्या माता आणि पिता यांच्याकडे
ई) चवथ्यांदा, मयत स्त्रिच्या
पित्याच्या वारसाकडे आणि
उ) शेवटी, मयत स्त्रिच्या
मातेच्या वारसांकडे प्रक्रांत होते.
तथापि,
(१) हिंदु स्त्रिला तिच्या पित्याकडून किंवा मातेकडून वारसा हक्काने
मिळालेली कोणतीही संपत्ती त्या मृत स्त्रीचा कोणताही मुलगा किंवा मुलगी (कोणत्याही मयत
मुलाची किंवा मुलीची अपत्ये धरून) यांच्याकडे जाईल.
असे वारस नसल्यास अशी संपत्ती मृत स्त्रिच्या
पित्याच्या वारसाकडे प्रक्रांत होईल आणि
(२) हिंदु स्त्रिला तिच्या पतीकडून किंवा तिच्या सासर्याकडून वारसा
हक्काने मिळालेली कोणतीही संपत्ती,
त्या मृत स्त्रिचा कोणताही मुलगा किंवा
मुलगी (कोणत्याही
मयत मुलाची किंवा मुलीची अपत्ये धरून)
यांच्याकडे जाईल. असे वारस नसल्यास, मृत स्त्रिच्या
पतीच्या वारसाकडे प्रक्रांत होईल.
आता मयत खातेदार हिराबाईचे
मुलगे व मुलगी (कोणताही मयत मुलगा किंवा मुलगी यांची अपत्ये धरून) आणि पती हे
वारस नसल्यामुळे किंवा मयत असल्यामुळे तिच्या पतीचे वारस, तिचे वारस ठरतात, त्यामुळे
विश्वासरावांच्या नावे वारस ठराव मंजूर करून घ्या".
Comments