खातेदार अविवाहित असतांना मयत
खातेदार अविवाहित असतांना मयत
वाचा : हिंदू वारसा कायदे ; महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १४९ व १५०.
मनोहर हा गावातील खातेदार अविवाहित असतांना
मयत झाला. तलाठी
यांनी मनोहरच्या घरी निरोप पाठवून वारसासंबंधी कागदपत्रे प्राप्त करुन घेतली.
गाव नमुना ६ क मध्ये वारस नोंद नोंदवली. स्थानिक चौकशी केली तेव्हा त्यांना असे
कळले की, मनोहरला जवळचे कोणीही वारस नाही. फक्त त्याच्या सख्ख्या मयत भावाचा
मुलगा शहरात शिकतो, तोच एकमेव नातेवाईक आहे. सख्ख्या मयत भावाचा मुलगा वारस ठरेल
की नाही याबाबत तलाठी भाऊसाहेब साशंक होते.
मंडलअधिकारी चावडीला भेट देण्यास आले
तेव्हा तलाठी भाऊसाहेबांनी त्यांना याबाबत प्रश्न विचारला. मंडलअधिकारी अनुभवी होते, त्यांनी तलाठी
भाऊसाहेबांची जिज्ञासा खालील प्रमाणे दूर केली. ते म्हणाले,
"मयत खातेदाराचे वारस,
त्या खातेदारास लागू असलेल्या वारसा कायद्याप्रमाणे निश्चित करावे लागतात. मयत खातेदार
हिंदू, बौध्द, जैन, शिख असल्यास,
हिंदू वारसा कायदा १९५६ प्रमाणे वारस निश्चित केले जातात, मयत खातेदार
मुस्लिम धर्मिय असल्यास मुस्लिम वारसा कायदा आणि मयत खातेदार पारसी, ख्रिश्चन धर्मिय
असल्यास भारतीय वारस अधिनियम, १९२५ अन्वये वारस निश्चित केले जातात. मयत मनोहर
हा खातेदार हिंदू असल्यामुळे आपण सध्या फक्त हिंदू वारसा कायद्यातील तरतुदी लक्षात घेऊ.
मृत्यूपत्र न करता मयत
झालेल्या हिंदू धर्मिय खातेदाराच्या बाबतीत हिंदू वारसा कायदा १९५६, कलम ८ अन्वये
प्रथम वर्ग १ च्या वारसांना मयताच्या संपत्तीत वारसाधिकार असतो. कलम आठ नुसार
मूळ बारा वारस नमूद केलेले होते, सप्टेंबर २००५ मध्ये या कायद्यात सुधारणा करून
शासनाने अजून चार वारस या यादीत समाविष्ट केल्याने आता वर्ग १ च्या यादीत एकूण
सोळा वारस आहेत.
वर्ग १ चे १६
वारस: मयताचा- (१) मुलगा, (२) मुलगी, (३) विधवा (एकाहून अधिक विधवा असतील तर सर्व विधवांना एकत्रीतपणे हिस्सा मिळेल) (४) मयताची आई (५) मयत मुलाचा मुलगा
(६) मयत मुलाची मुलगी
(७) मयत मुलीचा मुलगा
(८) मयत मुलीची मुलगी
(९) मयत मुलाची विधवा
(१०) मयत मुलाच्या
मयत मुलाचा मुलगा (११) मयत मुलाच्या
मयत मुलाची मुलगी
(१२) मयत मुलाच्या
मयत मुलाची विधवा अधिक (१३) मयत मुलीच्या
मयत मुलीचा मुलगा (१४) मयत मुलीच्या
मयत मुलीची मुलगी (१५) मयत मुलाच्या
मयत मुलीची मुलगी (१६) मयत मुलाच्या
मयत मुलीचा मुलगा.
या यादीतील उपलब्ध सर्व
वारसांना, एकाचवेळी मयत खातेदाराच्या मालमत्तेत हिस्सा मिळेल.
मयत खातेदार मनोहर
प्रमाणेच जर मयतास वरील वर्ग १ पैकी कोणीही वारस नसेल तर पुढील
वर्ग २ च्या वारसांकडे मयताची
संपत्ती वारसा हक्काने जाते.
वर्ग २ च्या वारसांचे नऊ गट आहेत.
वर्ग २ चे
वारस गट: मयताचे- (एक) वडील
(दोन) १) मुलाच्या मुलीचा
मुलगा २) मुलाच्या
मुलीची मुलगी ३) भाऊ ४) बहीण
(तीन) १) मुलीच्या मुलाचा
मुलगा २) मुलीच्या
मुलाची मुलगी ३) मुलीच्या मुलीचा मुलगा
४) मुलीच्या मुलीची
मुलगी
(चार) १) भावाचा मुलगा
२) बहिणीचा
मुलगा ३) भावाची
मुलगी ४) बहिणीची
मुलगी
(पाच) वडीलांचे वडील, वडीलांची आई
(सहा) वडीलांची विधवा, भावाची विधवा
(सात) वडीलांचा भाऊ
वडीलांची बहीण
(आठ) आईचे वडील, आईची आई
(नऊ) आईचा भाऊ, आईची बहीण
परंतु या यादीतील उपलब्ध
सर्व वारसांना, मयत खातेदाराच्या मालमत्तेत वर्ग १) मधील
वारसांप्रमाणे एकाचवेळी हिस्सा मिळत नाही.
मयताची संपत्ती प्रथम
वर्ग २ च्या गट (एक) मध्ये नमुद वारसांकडे समान हिस्स्यात प्रक्रांत होईल. वर्ग २ गट (एक) मधील वारस नसल्यास
ती वर्ग २ च्या गट (दोन) मध्ये नमुद केलेल्या वारसांकडे समान हिस्स्यात प्रक्रांत
होईल. याप्रमाणे
पुढे.
यानुसार मयत खातेदार
मनोहरच्या भावाचा मुलगा वर्ग २ च्या गट
चार मधील वारस आहे.
मयतास वर्ग १ आणि वर्ग २
चे वारस नसल्यास-
वर्ग ३ चे
वारस: मृताचे पितृबंधू,
म्हणजेच रक्ताच्या संबंधामुळे किंवा दत्तकग्रहणामुळे
पूर्णपणे पुरुषांद्वारे संबंध असलेल्या व्यक्ती.
मयतास वरील वर्ग १, वर्ग २ आणि वर्ग
३ पैकी कोणीही वारस नसेल तर पुढील वर्ग ४ च्या, मृताच्या भिन्न गोत्रज असणार्या वारसांकडे
मयताची संपत्ती वारसा हक्काने जाते.
वर्ग ४ चे
वारस: अकृतमृत्युपत्र व्यक्तीचे
मातृबंधू, म्हणजेच, रक्ताच्या नात्यामुळे किंवा दत्तकग्रहणामुळे पूर्णपणे पुरुषांद्वारे
संबंध नसलेल्या व्यक्ती.
आता मयत खातेदार मनोहरच्या भावाच्या मुलाच्या नावे वारस ठराव मंजूर करून घ्या".
Comments