सहवारसदाराच्‍या अप्रत्यक्ष कब्जा

 


१९. सहवारसदाराच्‍या अप्रत्यक्ष कब्जा :

 

वाचा : हिंदू वारसा कायदा १९५६ ; महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १४९ व १५०.

 

हरीभाऊ मयत झाल्‍यानंतर त्‍यांच्‍या एकत्र कुटुंबात मिळकतीचे कायदेशीर वाटप झाले. वाटपानुसार मिळकतीवर नावे दाखल करण्‍यासाठी तलाठी कार्यालयात लेखी अर्ज, संबंधित कागदपत्रांसह सादर केला गेला.

सदर नोंदणीकृत वाटपाची कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर तलाठी यांनी गाव नमुना ६ मध्ये त्याची नोंद घेतली. सर्व हितसंबंधीतांना नोटीस बजावली.

नोटीस मिळाल्यावर मयत हरीभाऊंचा मोठा मुलगा मनोज तलाठी यांच्‍याकडे आला आणि हरीभाऊंचा सर्वात लहान मुलगा नितीन हा शहरात राहतो, त्‍याचा मिळकतीवर प्रत्यक्ष कब्जा नाही म्हणून त्याला हिस्‍सा मिळण्‍याचा हक्‍क प्राप्‍त होत नाही अशी लेखी तक्रार दाखल केली.  

तलाठी भाऊसाहेबांनी त्‍याला तक्रारीची पोहोच नमुना १० मध्ये दिली. त्यानंतर ती तक्रार गाव नमुना ६-अ मध्ये नोंदवली.

मंडलअधिकारी चावडीला भेट देण्यास आले तेव्हा तलाठी यांनी ही तक्रार त्यांच्‍या निदर्शनास आणली. मंडलअधिकारी यांनी नमुना १२ मध्ये सर्व हितसंबंधीतांना नोटीस देऊन पंधरा दिवसानंतर सर्वांना त्याच चावडीत, पुराव्याच्या कागदपत्रांसह हजर ठेवण्याचे निर्देश तलाठी यांनी दिले.

 

सुनावणीच्या दिवशी मनोजने म्‍हणणे दाखल केले की, हरीभाऊंचा सर्वात लहान मुलगा नितीन हा शहरात राहतो, त्‍याला शेतीतले काही कळत नाही, त्‍याचा मिळकतीवर प्रत्यक्ष कब्जा नाही, त्‍यामुळे त्याला हरीभाऊंच्‍या मिळकतीत हिस्‍सा मिळण्‍याचा हक्‍क प्राप्‍त होत नाही.

मंडलअधिकारी यांनी सर्व हितसंबंधीतांचे म्हणणे नोंदवले आणि खालील आशयाचा कायदेशीर निकाल दिला,

" मा. सर्वोच्‍च न्‍यायालयाने दिलेल्‍या स्‍पष्‍ट निर्देशांन्‍वये (ए.आय.आर. १९९५, एस.सी., ८९५), एकत्र कुटुंबाच्या मिळकतीमध्ये सर्व सभासदांचा एकत्र हक्क व एकत्र कब्जा असतो. प्रत्येक सहवारसदारास सामाईक कब्जा व मिळकतीचा उपभोग घेण्याचा समान हक्क असतो. केवळ एखाद्या सहवारसदाराचा प्रत्यक्ष कब्जा नाही म्हणून त्याचा हक्क संपत नाही. एकत्र कुटुंबाच्या मिळकतीमध्ये असणारा कब्जा जरी एकट्याचा असला तरीही असा कब्जा सर्वांचा मिळुन असतो. त्‍यामुळे हरकत अर्जदाराच्‍या म्‍हणण्‍यात तथ्‍य आढळत नाही."    

b|b


Comments

Archive

Contact Form

Send