अपंग वारसाच्या हिस्स्याबद्दल तक्रार
२०. अपंग वारसाच्या हिस्स्याबद्दल
तक्रार :
वाचा : हिंदू वारसा कायदा १९५६, कलम २८ ; महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १४९ व १५०.
भिमराव मयत झाल्यानंतर त्यांच्या
एकत्र कुटुंबात मिळकतीचे कायदेशीर वाटप झाले. वाटपानुसार मिळकतीवर नावे दाखल करण्यासाठी
तलाठी कार्यालयात लेखी अर्ज, संबंधित कागदपत्रांसह सादर केला गेला.
सदर नोंदणीकृत वाटपाची कागदपत्रे प्राप्त
झाल्यानंतर तलाठी यांनी गाव नमुना ६ मध्ये त्याची नोंद घेतली. सर्व हितसंबंधीतांना नोटीस
बजावली.
नोटीस मिळाल्यावर मयत भिमरावांचा मोठा
मुलगा अनुप, तलाठी यांच्याकडे आला आणि भिमरावांचा सर्वात लहान मुलगा नितेश हा अपंग
आहे. त्याचे पालन-पोषण आम्हीच करतो, त्यामुळे त्याला भिमरावांच्या मिळकतीत हिस्सा
मिळण्याचा हक्क प्राप्त होत नाही अशी लेखी तक्रार दाखल केली.
तलाठी भाऊसाहेबांनी त्याला
तक्रारीची पोहोच नमुना १० मध्ये दिली. त्यानंतर ती तक्रार गाव नमुना ६-अ मध्ये नोंदवली.
मंडलअधिकारी चावडीला भेट देण्यास आले
तेव्हा तलाठी यांनी ही तक्रार त्यांच्या निदर्शनास आणली.
मंडलअधिकारी यांनी नमुना १२ मध्ये सर्व
हितसंबंधीतांना नोटीस देऊन पंधरा दिवसानंतर सर्वांना त्याच चावडीत, पुराव्याच्या कागदपत्रांसह
हजर ठेवण्याचे निर्देश तलाठी यांनी दिले.
सुनावणीच्या दिवशी अनुपने म्हणणे
दाखल केले की, भिमरावांचा सर्वात लहान मुलगा नितेश हा अपंग आहे. त्याचे पालन-पोषण
आम्हीच करतो आणि तहयात करणार आहोत. त्यामुळे त्याला भिमरावांच्या मिळकतीत हिस्सा
मिळण्याचा हक्क प्राप्त होत नाही.
मंडलअधिकारी यांनी सर्व हितसंबंधीतांचे
म्हणणे नोंदवले आणि खालील आशयाचा कायदेशीर निकाल दिला,
" हिंदू वारसा कायदा
१९५६, कलम २८ अन्वये कोणतीही व्यक्ती,
कोणत्याही व्याधी, वैगुण्य किंवा
व्यंग असल्याच्या कारणावरून अथवा या अधिनियमात उपबंधित केलेले आहे ते खेरीज करून अन्य
कोणत्याही कारणावरून कोणत्याही संपत्तीचा उत्तराधिकारी होण्यास अपात्र असणार नाही. त्यामुळे
हरकत अर्जदाराच्या तक्रारीचा विचार करता येणार नाही."
b|b
Comments