जमीन मालकाने कुळाला जमिनीची विक्री करणे
२१. जमीन मालकाने
कुळाला जमिनीची विक्री करणे :
वाचा : महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, कलम ६४(१, )(२), (७), (अ). (ब), ८४ क.
किसनरावांच्या
शेतजमिनीत सखाराम संरक्षीत कुळ होता. किसनराव आणि सखारामचे संबंध जिव्हाळ्याचे
असल्यामुळे किसनरावांनी सखारामला, तो ज्या जमिनीत कुळ होता ती जमीन विकत दिली.
सदर व्यवहाराची नोंदणीकृत कागदपत्रे
प्राप्त झाल्यानंतर तलाठी यांनी गाव नमुना ६ मध्ये त्याची नोंद घेतली. सर्व हितसंबंधीतांना नोटीस
बजावली.
सर्व हितसंबंधीत हजर राहिल्यानंतर
तलाठी भाऊसाहेबांनी त्यांची संमतीदर्शक स्वाक्षरी नोटीस पुस्तकावर घेतली.
मुदत कालावधी संपल्यानंतर
मंडलअधिकारी यांनी संबंधीत फेरफारवर 'महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, कलम ६४(१),(२),(७),(अ),(ब) विरूध्द
व्यवहार, महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम,
कलम ८४ क अन्वये कारवाई होणेसाठी प्रकरण
तहसिलदार यांच्याकडे पाठवावे. नोंद रद्द.' असा शेरा लिहिला.
तलाठी
भाऊसाहेबांना आश्चर्य वाटले, त्यांनी मंडलअधिकार्यांना प्रश्न केला की, 'किसनरावांच्या
शेतजमिनीत सखाराम संरक्षीत कुळ आहे. तसेही त्याला किसनरावांची जमीन कायद्यानुसार
मिळणारच आहे. तर स्वत: किसनरावांनीच त्याला जमीन विकली तर काय चुकले?'
मंडलअधिकार्यांनी
उत्तर दिले, 'कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम हा कायदा कुळांच्या हक्कांचे
संरक्षण करण्यासाठी, त्यांची पिळवणूक होऊ नये आणि त्यांना कोणी फसवु नये या उद्देशाने
तयार करण्यात आला आहे. जमीनमालकाने, कुळ कसत असलेली जमीन, त्यालाच विकत देण्यास
कायद्याची बाधा नाही परंतु याच कायद्यात कलम ६४(१),(२),(७),(अ),(ब) अन्वये त्याची
पध्दत विहित केलेली आहे. आज किसनरावांनी सखाराम कडून कदाचित जमीन विक्री करतांना
जास्त रक्कम घेतली असेल परंतु शेत जमीन न्यायाधिकरणाने कलम ६३-अ अन्वये योग्य
ती कायदेशीर रक्कम ठरवली असती आणि व्यवहार कायदेशीर झाला असता. कुळवहिवाट अधिनियमाखालील
कोणत्याही जमिनीची खरेदी किंवा विक्री शेत जमीन न्यायाधिकरणाच्या परवानगीशिवाय
होऊ शकत नाही.'
b|b
Comments