पुनर्विवाहानंतर विधवेचा मिळकतीत हिस्‍सा

 


२२. पुनर्विवाहानंतर विधवेचा मिळकतीत हिस्‍सा :

 

वाचा : हिंदू वारसा कायदा १९५६.

 

गणपतराव तरूण वयात मयत झाल्‍यानंतर त्‍यांच्‍या सर्व मिळकतीचे कुटुंबियांमध्‍ये कायदेशीर वाटप करण्‍यात आले. या वाटपामध्‍ये मयत गणपतरावांच्‍या विधवेलाही कायदेशीर हिस्‍सा देण्‍यात आला होता. तसा फेरफारही मंजूर करण्‍यात आला होता.

कालांतराने गणपतरावांच्‍या विधवेने दुसरा विवाह केला. यावर नाराज होऊन मयत गणपतरावांचा भाऊ, हरीष, हरकत अर्ज घेऊन तलाठी भाऊ साहेबांकडे आला. योगायोगाने मंडलअधिकारी चावडीतच होते. त्‍यांनी त्‍याच्‍याकडे चौकशी केली असता, त्‍याने सांगितले की, गणपतराव मयत झाल्‍यानंतर त्‍यांच्‍या विधवेला जो हिस्‍सा देण्‍यात आला होता, तो आता त्‍या विधवेने दुसरा विवाह केल्‍यामुळे बेकायदेशीर ठरतो. त्‍यामुळे यासाठी जो फेरफार मंजूर करण्‍यात आला होता तो रद्‍द करावा.

मंडलअधिकारी यांनी त्‍याला सांगितले की, एकदा प्रमाणित किंवा रद्‍द झालेल्‍या फेरफारबाबत, तलाठी किंवा मंडलअधिकारी स्‍तरावर कायद्‍यानुसार कोणताच बदल करता येत नाही. तसेच फेरनोंद करण्‍याचा अधिकार किंवा कायदेशीर तरतुद तलाठी किंवा मंडलअधिकारी स्‍तरावर नाही. त्‍यासाठी उपविभागीय अधिकार्‍यांकडे अपील दाखल करावे लागते.

तसेच, ए.आय.आर. १९७१, मुंबई, ४१३ मध्‍ये नमुद र्सोच्‍च न्‍यायालयाच्‍या निकालानुसार, हिंदू विधवेला तिच्या पतीच्या निधनानंतर वारस हक्‍काने प्राप्त झालेल्‍या मिळकतीची ती संपूर्ण मालक बनते. त्यानंतर जरी त्या विधवेने पुनर्विवाह केला तरीही तिला पती निधनानंतर वारस हक्‍काने मिळालेल्या मिळकतीवरील तिचा हक्क नष्ट  होत नाही.

त्‍यामुळे अपील दाखल करायचे की नाही हा निर्णय तुम्‍हीच घ्‍यावा. या चर्चेनंतर हरीषने तिथून निघून जाणे पसंत केले.  

                                                          b|b

Comments

Archive

Contact Form

Send