मृत्यूपत्राबाबत तक्रार
वाचा : भारतीय वारसा कायदा १९२५, कलम २ ; हिंदू उत्तराधिकार अधिनियम-१९५६ ; महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १४९.
गणपतराव हे खातेदार मयत झाले. त्याच्या हयातीत त्यांनी
भारतीय वारसा कायदा १९२५, कलम २ अन्वये त्याच्या मालमत्तेचे मृत्यूपत्र करून ठेवले होते. वारस नोंदीची आणि मृत्यूपत्राबाबतची
कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर तलाठी भाऊसाहेबांनी अर्जानुसार गाव नमुना ६ क मध्ये नोंद
घेतली. स्थानिक चौकशी केली. आणि वारस ठराव मंजूर झाल्यानंतर गाव नमुना ६ मध्ये त्याची
नोंद करून सर्व हितसंबंधीतांना नोटीस बजावली. नोटीस
मिळाल्यावर मयत गणपतरावांचा मोठा मुलगा किशोर, तलाठी यांच्याकडे आला आणि
गणपतरावांनी मृत्यूपत्र केले होते याबाबत शंका व्यक्त करुन लेखी तक्रार दाखल
केली. तलाठी भाऊसाहेबांनी त्याला तक्रारीची पोहोच नमुना १० मध्ये दिली. त्यानंतर ती तक्रार गाव नमुना
६-अ मध्ये नोंदवली.
मंडलअधिकारी
चावडीला भेट देण्यास आले तेव्हा तलाठी यांनी ही तक्रार त्यांच्या निदर्शनास आणली. मंडलअधिकारी यांनी नमुना
१२ मध्ये सर्व हितसंबंधीतांना नोटीस देऊन पंधरा दिवसानंतर सर्वांना त्याच चावडीत, पुराव्याच्या कागदपत्रांसह
हजर ठेवण्याचे निर्देश तलाठी यांनी दिले.
सुनावणीच्या दिवशी
किशोरने त्याचे म्हणणे मांडले की, गणपतरावांनी केलेले मृत्यूपत्र स्टँप पेपरवर
नाही, ते नोंदणीकृतही नाही. त्यामुळे मृत्यूपत्र संशयास्पद आहे.
मंडलअधिकारी यांनी मृत्यूपत्रावर साक्षीदार
म्हणून स्वाक्षरी करणार्या साक्षीदारांना आणि मृत्यूपत्रावर स्वाक्षरी करणार्या
डॉक्टरला नोटीस बजावण्याची व्यवस्था केली आणि ते हजर झाल्यावर त्यांचा शपथेवर
जबाब घेतला. मृत्यूपत्र खरे असल्याची स्वत:ची खात्री झाल्यानंतर त्यांनी
निकालपत्रात वरील बाबी आणि साक्षी पुराव्यांचा उल्लेख करून खुलासा केला की, "कायद्यान्वये
मृत्यूपत्र साध्या कागदावरही करता येते. ते स्टँपपेपरवर असावे असे बंधन नाही.
तसेच नोंदणी कायदा १९०८, कलम १८ (ड) मध्ये मृत्यूपत्राचा समावेश असल्याने त्याची
नोंदणी वैकल्पिक आहे. रामगोपाल लाल वि.
ऐपिनकुमार ४९.ए. आय. आर ४१३ या निकालान्वये मृत्युपत्र हा एक पवित्र दस्त मानला गेला आहे. अशा दस्ताद्वारे
मृत व्यक्ती आपल्या संपत्तीच्या विल्हेवाटीबाबतची इच्छा व्यक्त करीत असते. म्हणून मृत्युपत्राचे
एक गंभीर व पवित्र दस्त म्हणून पालन केले गेले पाहिजे.
जरूर तर अर्जदाराने
दिवाणी न्यायालयात दाद मागावी. अर्जदाराच्या हरकतीत तथ्य दिसत नाही त्यामुळे
अर्जदाराचा हरकत अर्ज फेटाळण्यात येत आहे."
Comments