खातेदाराचा खुन करणारा वारस
१७. खातेदाराचा खुन करणारा वारस :
वाचा : हिंदू वारसा कायदा १९५६, कलम २५ आणि २७ ; महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १४९ व १५०.
कौटुंबिक वादातून भांडण विकोपाला जाऊन
कृष्णरावांचा मुलगा हनमंतने, त्यांचा खुन केला. कायद्यानुसार त्याला शिक्षाही
झाली. दरम्यान मयत कृष्णरावांच्या वारसांची नावे गाव दप्तरी दाखल करण्यासाठी
तलाठी कार्यालयात लेखी अर्ज, संबंधित कागदपत्रांसह सादर केला गेला.
कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर तलाठी
भाऊसाहेबांनी अर्जानुसार गाव नमुना ६ क मध्ये नोंद घेतली.
मुदतीनंतर मंडलअधिकारी यांनी जेव्हा
सदर वारस ठरावावर निर्णय घेण्यासाठी कागदपत्रे बघीतली तेव्हा मयत कृष्णरावांचा
मुलगा हनमंतचे नावही त्यांना वारस अर्जानुसार गाव नमुना ६ क मध्ये लिहिलेले
आढळले. त्यांनी तलाठी भाऊसाहेबांना त्याचे कारण विचारले तेव्हा तलाठी
भाऊसाहेबांचे म्हणणे होते की, एकतर हनमंतचे नाव वारस अर्जात नमुद होते आणि तो मयत
कृष्णरावांचा मुलगा असल्याने तो त्यांचा कायदेशीर वारस आहेच.
मंडलअधिकारी यांनी हिंदू उत्तराधिकार
अधिनियम-१९५६
चे पुस्तक मागवले आणि त्यातील कलम २५ आणि २७ कडे तलाठी भाऊसाहेबांचे लक्ष वेधले.
तलाठी भाऊसाहेबांनी या तरतुदींचे मोठ्याने वाचन केले.
हिंदू उत्तराधिकार अधिनियम-१९५६, कलम
२५ : जी व्यक्ती खातेदाराचा
खून करेल किंवा खून करण्यास अपप्रेरणा देईल ती खून झालेल्या खातेदाराच्या संपत्तीत
वारसाने अथवा उत्तराधिकाराने हिस्सा मिळण्यास अपात्र ठरेल.
हिंदू उत्तराधिकार अधिनियम-१९५६, कलम
२७ : वाटपास अपात्र
व्यक्ती जणू काही मयत आहे असे समजुन वाटप करण्यात यावे.
तलाठी भाऊसाहेब या तरतुदींचे मोठ्याने
वाचन करीत असतांना, मंडलअधिकारी यांनी हनमंतचे नाव वगळून, मयत कृष्णरावांच्या
इतर वारसांच्या नावे वारस ठराव मंजूरही केला होता.
b|b
Comments