परागंदा असलेल्या व्यक्तीच्या वारसाची नोंद

 


३२. परागंदा असलेल्या व्यक्तीच्या वारसाची नोंद :

 

वाचा : भारतीय वारस कायदा १९२५ ; भारतीय पुरावा कायदा १८७२ कलम १०७, १०८ ; महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १४९, १५०.

 

विनोद गावातून बराच काळ परागंदा होता. त्याची पत्नी पार्वतीबाई, स्‍वत:ची आणि मुलांची नावे वारस म्हणून लावण्यासाठी तलाठी यांच्याकडे सतत तगादा लावत असत.

एकदा मंडलअधिकारी चावडीत उपस्‍थित असतांना पार्वतीबाई तिच्‍या मुलांसह चावडीत आली आणि स्‍वत:ची आणि मुलांची नावे विनोदचा वारस म्हणून लावण्यासाठी विनंती करू लागली.

मंडलअधिकार्‍यांनी तिला सांगितले की, तुमची नावे आम्‍ही स्‍वत:हून विनोदचे वारस म्हणून दाखल करू शकत नाही. त्‍यासाठी तुम्‍हाला, विनोद सात किंवा अधिक वर्षे परागंदा आहे आणि त्याचा ठावठिकाणा किंवा बातमी मिळून येत नाही असे दिवाणी न्यायालयात सिध्‍द करावे लागेल. त्‍यानंतर भारतीय पुरावा कायदा, १८७२ च्‍या कलम १०७, १०८ अन्वये दिवाणी न्‍यायालय तुम्‍हाला वारस दाखला देईल. तो वारस दाखला आणि प्रतिज्ञापत्र आम्‍हाला आणून दिल्‍यानंतर तुमचे आणि तुमच्‍या मुलांचे नाव विनोदचे वारस म्हणून दाखल करण्‍यात येईल.

वरील खुलास्‍यानंतर पार्वतीबाईला योग्‍य तो मार्ग सापडल्‍याचे समाधान मिळाले. आणि ती दिवाणी न्‍यायालयातून वारस दाखला मिळवण्‍याच्‍या तयारीला लागली

Comments

Emotions
Copy and paste emojis inside comment box

Archive

Contact Form

Send