साठेखतावरुन (Agreement to sale) नोंद

 


४१. साठेखतावरुन (Agreement to sale) नोंद :

 

वाचा : मालमत्ता हस्‍तांतरण कायदा, १८८२, कलम ५४ ; महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १४९ व १५०.

 

लक्ष्‍मणरावांनी स्‍वत:च्‍या मालकीची जमीन हनमंतरावांना देण्‍याचे ठरवले. त्‍याबाबत दोघांनी कागदोपत्री अनोंदणीकृत साठेकरार केला आणि तो दस्‍त घेऊन ते दोघे तलाठी कार्यालयात आले आणि त्‍याची नोंद करण्‍याची विनंती केली.

योगायोगाने मंडलअधिकारी तेथे होते. त्‍यांनी लक्ष्‍मणराव आणि हनमंतरावांना समजावून सांगितले की, साठेखताचा अनोंदणीकृत दस्त हा निव्वळ विक्रीचा करार असून साठेखतामुळे कोणताही अधिकार प्राप्त होत नाही. तुम्‍ही हजर केलेला साठेखताचा दस्त, अनोंदणीकृत असल्यामुळे गाव दप्तरी त्याची नोंद घेता येणार नाही.

तुम्‍ही जर हे साठेखत नोंदणीकृत केले तरी मी त्‍याची नोंद इतर हक्कसदरी नोंदवण्याचे आदेश देईन कारण साठेखताचा दस्त जरी नोंदणीकृत असला साठेखत म्हणजे निव्वळ विक्रीचा करार आहे व अशा करारामुळे कोणताही अधिकार प्राप्त होत नाही किंवा कोणताही अधिकार तबदील होत नाही. फक्‍त नोंदणीकृत खरेदी खतामुळेच अधिकारांचे हस्‍तांतरण होऊ शकते. मालमत्ता हस्‍तांतरण कायदा, १८८२, कलम ५४ मध्‍ये 'विक्री' ची व्‍याख्‍या करतांना या दोन्‍ही संकल्‍पना स्‍पष्‍ट केलेल्‍या आहेत.

लक्ष्‍मणराव आणि हनमंतरावांना साठेखत आणि खरेदीखत या दोन्‍ही संकल्‍पना स्‍पष्‍ट झाल्‍या.


Comments

Archive

Contact Form

Send