हक्‍क नोंदणीसाठी कागदपत्रांची यादी

 


७५. हक्‍क नोंदणीसाठी कागदपत्रांची यादी :

 

वाचा : महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ कलम १४८ ते १५१ ; शासन परिपत्रक क्रमांक संकिर्ण-२०१०/प्र.क्र.३५२/ल-६, दिनांक १५ जुलै २०१०.

 

मंडलअधिकार्‍यांनी सर्व नवनियुक्‍त तलाठ्‍यांना हक्‍कनोंदणीच्‍या प्रशिक्षणासाठी बोलविले होते. चर्चा करतांना अशी बाब समोर आली की, विविध हक्‍कनोंदणीची नोंद फेरफार पुस्‍तकात नोंदवितांना अर्जदारांकडून घेण्‍यात येणार्‍या कागदपत्रांमध्‍ये सुसूत्रता असावी यासाठी कागदपत्रांची एक यादी असावी आणि त्‍यानुसारच अर्जदारांकडून कागदपत्रे घेण्‍यात यावीत.

मंडलअधिकार्‍यांनी सांगितले की अशी यादी शासन परिपत्रक क्रमांक संकिर्ण-२०१०/प्र.क्र.३५२/ल-६, दिनांक १५ जुलै २०१० नुसार तयार करुन दिलेली आहे. आणि त्‍याचा अवलंब प्रत्‍येकाने करावा अशा सूचना आहेत. विविध हक्‍कनोंदणीची नोंद फेरफार पुस्‍तकात नोंदवितांना खालील प्रमाणे कागदपत्रे घ्‍यावीत.

अ.क्र.

संपादनाचा प्रकार

आवश्‍यक कागदपत्रे

वारसा हक्‍क,

उत्तराधिकार

मूळ किंवा प्रमाणित मृत्‍यू-दाखला, प्रतिज्ञापत्र/स्‍वयंघोषणापत्र, पोलीस पाटील/ग्रामसेवक/सरपंच यांचा दाखला, अर्जातील सर्व वारसांबाबत वय, पत्ता, दुरध्‍वनी/भ्रमण ध्‍वनी यांचा पुराव्‍यासह तपशील.

खरेदी/ बक्षीसपत्र/ गहाणखत/ भाडेपट्‍टा/

संबंधित नोंदणीकृत दस्‍ताची प्रमाणित प्रत, सूची क्र. २, शेतकरी पुरावा, प्रतिज्ञापत्र/स्‍वयंघोषणापत्र, सर्व हितसंबंधितांचा रहिवास पुरावा. 

हक्‍कसोडपत्र

नोंदणीकृत हक्‍कसोडपत्राची प्रमाणित प्रत, सूची क्र. २, प्रतिज्ञापत्र/स्‍वयंघोषणापत्र, सर्व हितसंबंधितांचा रहिवास पुरावा. 

मृत्‍यू-पत्र

मृत्‍यू-दाखला, मृत्‍युपत्राची प्रमाणित प्रत, प्रतिज्ञापत्र, सर्व हितसंबंधितांचा रहिवास पुरावा. 

वाटप

नोंदणीकृत वाटपत्राची प्रमाणित प्रत किंवा म.ज.म.अ कलम ८५ चा आदेश, मोजणीचा अहवाल.

विकसन करार

नोंदणीकृत विकसनकराराची प्रमाणित प्रत, सूची क्र. २, प्रतिज्ञापत्र/स्‍वयंघोषणापत्र, सर्व हितसंबंधितांचा रहिवास पुरावा. 

न्‍यायालयीन आदेश

न्‍यायालयीन आदेशाची प्रमाणित प्रत, प्रतिज्ञापत्र/स्‍वयंघोषणापत्र, सर्व हितसंबंधितांचा रहिवास पुरावा.   

शासकीय आदेश

शासकीय आदेशाची मूळ प्रत, प्रतिज्ञापत्र, सर्व हितसंबंधितांचा रहिवास पुरावा.   

प्रत्‍येक प्रतिज्ञापत्र/स्‍वयंघोषणापत्राच्‍या शेवटच्‍या परिच्‍छेदात, या प्रतिज्ञापत्र/स्‍वयंघोषणापत्रातील मजकूर माझ्या माहितीप्रमाणे खरा आणि बरोबर आहे असे नमूद करावे. आणि त्‍याखाली शेवटी 'खोटे प्रतिज्ञापत्र करणे हा भारतीय दंड संहिता कलम १९१ अन्वये गंभीर गुन्हा असून असे कृत्य भारतीय दंड संहिता कलम १९३, १९९ अन्वये शिक्षेस पात्र आहे याची मला जाणिव आहे' असा उल्लेख करणे बंधनकारक करावे.

वारसा हक्‍क, उत्तराधिकारबाबतच्‍या प्रतिज्ञापत्र/स्‍वयंघोषणापत्रात उपरोक्‍त मजकूराच्‍या आधी 'याशिवाय कोणीही वारस नाही आणि कोणताही वारस डावलला गेला नाही' असा उल्लेख करणे बंधनकारक करावे.


Comments

Archive

Contact Form

Send