अकृषीक वापरासाठी जमिनीच्या तुकड्याची खरेदी
७४. अकृषीक वापरासाठी जमिनीच्या
तुकड्याची खरेदी :
वाचा : तुकडेजोड-तुकडेबंदी कायदा १९५९ कलम ७, ८, ८अअ ; महाराष्ट्र
शासन राजपत्र, दिनांक १/१/२०१६.
अजितने नगरपरिषद क्षेत्रातील वाणिज्यिक
वापरासाठी नेमून दिलेल्या अकृषिक जमिनीपैकी पाच आर क्षेत्र खरेदी केले.
याबाबतची कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर
तलाठी यांनी गाव नमुना ६ मध्ये त्याची नोंद घेतली.
सर्व हितसंबंधीतांना नोटीस बजावली. तलाठी भाऊसाहेबांना
खात्री होती की या व्यवहारात तुकडेजोड-तुकडेबंदी कायदाचा भंग झाला आहे त्यामुळे
मंडलअधिकारी ही नोंद निश्चितपणे रद्द करणार.
मुदत कालावधी संपल्यानंतर
मंडलअधिकार्यांनी ती नोंद प्रमाणित केल्यामुळे तलाठी भाऊसाहेबांना आश्चर्य
वाटले. त्यांनी तुकडेजोड-तुकडेबंदी कायदा १९५९ कलम ७, ८, ८अअ च्या तरतूदी
मंडलअधिकार्यांच्या निदर्शनास आणून दिल्या.
मंडलअधिकार्यांनी खुलासा केला की,
महाराष्ट्र शासन राजपत्र, दिनांक १/१/२०१६ अन्वये तुकडेजोड-तुकडेबंदी कायद्यात
८ब हे नवीन कलम दाखल करण्यात आले आहे. ज्यामुळे महानगरपालिका, नगरपरिषदांच्या
सीमांमध्ये स्थित असलेल्या किंवा महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचनाअधिनियमाच्या
तरतुदींन्वये प्रारुप किंवा अंतिम योजनेमध्ये, निवासी, औद्योगिक, वाणिज्यिक
वापरासाठी किंवा कोणत्याही अकृषिक वापरासाठी नेमून दिलेल्या जमिनींना
तुकडेजोड-तुकडेबंदी कायदा १९५९ कलम ७, ८, ८अअ च्या तरतूदी लागू होणार नाहीत.
अजितने खरेदी केलेले क्षेत्र जरी
प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी असले तरी ते नगरपरिषद क्षेत्रातील वाणिज्यिक
वापरासाठी नेमून दिलेल्या अकृषिक जमिनीपैकी आहे त्यामुळे ही नोंद प्रमाणित करणे
कायदेशीर आहे.
Comments