'कृषी' जमिनीची चौकशी

 


७३. 'कृषी' जमिनीची चौकशी :

 

वाचा : महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, कलम २(१), ३२(ओ)

 

महेशने तहसिलदारकडे महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, कलम ३२(ओ) अन्‍वये त्‍याला प्रल्‍हादरावांच्‍या शेतजमिनीत कृषक दिनानंतर कुळ ठरविणेकामी अर्ज केला होता.

तहसिलदारांनी आदेश दिला होता की, तलाठी यांनी प्रल्‍हादरावांच्‍या शेतजमिनीला प्रत्‍यक्ष भेट देऊन, त्‍यात कोणती पिके आहेत याचा अहवाल सादर करावा.

तलाठी भाऊसाहेबांनी प्रल्‍हादरावांच्‍या शेतजमिनीचे जुने गाव नमुना बारा बघितले, त्‍यात 'गवतपड' असा उल्‍लेख होता तसेच शेतजमिनीच्‍या प्रत्‍यक्ष भेटीतही 'गवत' दिसून आले.

'गवत' हे पिक या सदरात येते की नाही याबाबत तलाठी साशंक होते. त्‍यांनी याबाबत मंडलअधिकार्‍यांना विचारण्‍याचे ठरविले.

मंडलअधिकारी आल्‍यानंतर त्‍यांनी याबाबत विचारणा केली. मंडलअधिकार्‍यांनी खुलासा केला की,

महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, कलम २(१) मध्‍ये 'कृषी' ची व्‍याख्‍या दिलेली आहे. 'कृषी' या संज्ञेत फलोत्‍पादन, पिके काढणे यांचा समावेश होतो. परंतु एखाद्‍या व्‍यक्‍तीने जमिनीत फक्‍त 'गवत' उगवतो असा उल्‍लेख केला असेल तर त्‍याचा समावेश 'कृषी' या व्‍याख्‍येत होत नाही तथापि, अशा व्‍यक्‍तीने गुरांना चरणेसाठी गवत वाढविले असेल आणि अशा जमिनीमध्‍ये गुरांना गवत चरण्‍यासाठी मुक्‍तपणे वावर दिला असेल आणि तो अशी कृती सिध्‍द करू शकत असेल तरच 'गवत' चा समावेश हे पिक या सदरात करता येतो आणि त्‍याचा समावेश 'कृषी' या व्‍याख्‍येत करता येतो. (विश्राम काला वि. पी. एम. शाह, १९६० जी.एल.आर.२३)        

मंडलअधिकार्‍यांनी तलाठी भाऊसाहेबांना फार महत्‍वाची माहिती दिली होती.


Comments

Archive

Contact Form

Send