विवाहामुळे नावात बदल
वाचा : हिंदू विवाह कायदा १९५५ ; विशेष विवाह कायदा, १९५४
वामनरावांच्या मुलगी यशोदाचा विवाह
झाला. रितीरिवाजाप्रमाणे विवाहानंतर तिचे नाव ममता असे बदलण्यात आले. वामनरावांच्या
शेतजमिनीत तिचे नाव सहहिस्सेदार म्हणून नमूद होते. विवाहानंतर तिचे सर्व व्यवहार
तिच्या नवीन ममता नावाने सुरू झाले, त्यामुळे भविष्यात कायदेशीर अडचण होऊ नये
म्हणून तिने गावातील वामनरावांच्या शेतजमिनीत तिचे सहहिस्सेदार म्हणून असणारे
नाव बदलण्याचा निर्णय घेतला. ती वामनरावांसह अर्ज घेऊन तलाठी कार्यालयात गेली.
तलाठी आणि मंडलअधिकारी दोघेही चावडीत
होते. यशोदा उर्फ ममताने तलाठी भाऊसाहेबांकडे अर्ज देऊन विषय सांगितला.
मंडलअधिकार्यांनी तिच्याकडे
विवाहाचे प्रमाणपत्र आणि नाव बदलल्याचे राजपत्र मागितले.
विवाहाचे प्रमाणपत्र आणि नाव बदलल्याचे
राजपत्र या दोन्ही विषयांबाबत वामनराव आणि यशोदा उर्फ ममता अनभिज्ञ होते. त्यांनी
मंडलअधिकार्यांना तपशील सांगण्याची विनंती केली.
मंडलअधिकारी म्हणाले,
भारतात हिंदू विवाह कायदा १९५५ आणि
विशेष विवाह कायदा, १९५४ या दोन कायद्याप्रमाणे विवाह पार पाडले जातात.
हिंदू विवाह कायदा १९५५ हा फक्त
हिंदू धर्मिय (हिंदू, बौध्द, जैन, शिख आणि धर्मांतरित हिंदू) व्यक्तींच्या,
धार्मिक पध्दतीने पार पडलेल्या विवाहांना लागू होतो. यात विवाह निबंधकासमक्ष
विवाह करण्याची आवश्यकता नसते. ज्या विवाह निबंधकाच्या कार्यक्षेत्रात असा
विवाह पार पडला असेल त्याच्याकडे विवाहाचे जरुर ते पुरावे (लग्न समारंभाचे
दोन फोटो, लग्नाची निमंत्रण पत्रिका, वर आणि वधुचे वयाचे आणि पत्त्याचे पुरावे
आणि नोटरी किंवा कार्यकारी दंडाधिकारी यांच्या समक्ष केलेले प्रतिज्ञापत्र ज्यात
'सदर विवाह हिंदू विवाह कायदा १९५५ नुसार झाला असून, विवाहाच्यावेळी वर आणि वधु
दोघेही मानसिकदृष्ट्या स्वस्थ होते आणि सदरचा विवाह प्रतिबंधीत नातेसंबंधात
झालेला नाही' असे नमूद असावे.) सादर करावे. अर्ज भरून, वर आणि वधु, दोघांचे
पालक आणि दोन साक्षीदारांनी विवाह निबंधकासमक्ष स्वाक्षरी करावी. यानंतर काही
दिवसात विवाह प्रमाणपत्र दिले जाते. हे विवाह प्रमाणपत्र, विवाहाचा पुरावा म्हणून
सर्वत्र ग्राह्य मानले जाते.
विशेष विवाह कायदा, १९५४ हा सर्व
भारतीय नागरिकांना लागू होतो. यात धर्माचे बंधन नाही. यात विशेष विवाह कायद्यान्वये
अधिकार प्रदान केलेल्या विवाह अधिकारी किंवा विवाह निबंधक यांच्याकडे, विवाहाच्या
एक महिना आधी विवाहाची नोटीस देणे आवश्यक आहे. या नोटीसीची एक प्रत नोटीस
बोर्डावर प्रसिध्द केली जाते आणि एक प्रत, ज्या भागात वर आणि वधु रहातात, त्या
भागातील विवाह अधिकार्याकडे प्रसिध्दीसाठी पाठविण्यात येते. जर एका महिन्याच्या
कालावधीत कोणतीही हरकत नोंदवली गेली तर विवाह अधिकारी योग्य तो निर्णय घेतात.
कोणतीही हरकत नोंदवली गेली नाही तर मुदतीनंतर (वर आणि वधुचे प्रत्येकी दोन
फोटो, वर आणि वधुचे वयाचे आणि पत्त्याचे पुरावे आणि नोटरी किंवा कार्यकारी
दंडाधिकारी यांच्या समक्ष केलेले प्रतिज्ञापत्र ज्यात 'सदर विवाह हिंदू विवाह
कायदा १९५५ नुसार झाला असून, विवाहाच्यावेळी वर आणि वधु दोघेही मानसिकदृष्ट्या
स्वस्थ होते आणि सदरचा विवाह प्रतिबंधीत नातेसंबंधात झालेला नाही' असे नमूद
असावे.) पुरावे सादर करावे. वर आणि वधु, दोघांचे पालक आणि तीन साक्षीदारांनी
विवाह निबंधकासमक्ष स्वाक्षरी करावी. यानंतर काही दिवसात विवाह प्रमाणपत्र दिले
जाते. हे विवाह प्रमाणपत्र, विवाहाचा पुरावा म्हणून सर्वत्र ग्राह्य मानले जाते.
दिनांक २५ ऑक्टोबर २००६ रोजी, सर्वोच्च
न्यायालयाच्या न्यायाधिश अर्जित पसायत आणि पी. सतसिवम यांच्या खंडपिठाने राष्ट्रीय
महिला आयोगाच्या मताला सहमती दर्शवून, प्रत्येक विवाह, विवाहाच्या दोन पैकी एका
कायद्याखाली नोंदणी केलेला असणे बंधनकारक केले आहे.
त्यामुळे तुम्हाला यशोदाच्या
विवाहाची नोंदणी करावीच लागेल.
तसेच विवाहानंतर नाव बदलले असल्यास
राजपत्रात ते प्रसिध्द करावे लागते. राजपत्र हे नगर विकास मंत्रालयाच्या प्रकाशन
विभागामार्फत दर आठवड्याला प्रसिध्द केले जाते. यासाठी जरूर त्या पुराव्यासह
अर्ज भरून द्यावा लागतो. राजपत्रात माहिती प्रसिध्द झाल्यावर त्याची प्रत देण्यात
येते. राजपत्रात प्रसिध्द झालेली माहिती कायदेशीर पुरावा म्हणून ग्राह्य मानली
जाते.
त्यामुळे यशोदाच्या विवाहाचे
प्रमाणपत्र आणि तिचे विवाहानंतर बदललेले नाव राजपत्रात प्रसिध्द करुन त्याची
प्रत आणून दिल्यावर महसूल दप्तरी त्याची नोंद घेता येईल.
मंडलअधिकार्यांनी वामनराव आणि यशोदा
उर्फ ममताला फार महत्वाची माहिती दिली होती.
Comments