परदेशी नागरिकाने भारतात शेतजमीन खरेदी करणे
७१. परदेशी नागरिकाने भारतात शेतजमीन
खरेदी करणे :
वाचा : परकीय चलन
व्यवस्थापन कायदा (फेमा) १९९९, कलम ६(३)
जॉन डिकोस्टा या परदेशी नागरिकाने
उत्तमरावांकडून त्यांच्या मालकीची असणारी शेतजमीन खरेदी केली. या व्यवहाराची
संबधीत कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर तलाठी यांनी गाव नमुना ६ मध्ये त्याची नोंद घेतली. सर्व हितसंबंधीतांना नोटीस
बजावली.
मुदत कालावधी संपल्यानंतर
मंडलअधिकार्यांनी ती नोंद 'फेमा कायद्याचे उल्लंघन' असा शेरा नोंदवून रद्द
केली.
तलाठी भाऊसाहेबांनी कारण विचारल्यावर
मंडलअधिकार्यांनी खुलासा केला की,
परदेशी नागरिकाच्या भारतातील स्थावर
मालमत्ता खरेदीचे नियमन परकीय चलन व्यवस्थापन कायदा (फेमा) १९९९,
कलम ६(३) अन्वये केले जाते.
परकीय चलन व्यवस्थापन कायदा (फेमा)
१९९९, कलम २(व्हि),२(डब्ल्यु) अन्वये परदेशी नागरीक म्हणजे, (१) अनिवासी
भारतीय (NRI)
किंवा मूळ भारतीय वंशाचा परदेशी
नागरीक (PIO)
किंवा मूळ भारतीय वंशाचा नसलेला परदेशी नागरीक असे नमूद आहे.
परकीय चलन व्यवस्थापन कायदा (फेमा)
१९९९, कलम ६(५) अन्वये अनिवासी भारतीय किंवा मूळ भारतीय वंशाचा परदेशी नागरीक
भारतामध्ये शेतजमीन वगळता इतर स्थावर मालमत्ता खरेदी किंवा धारण करू शकतो.
पाकिस्तान, बंगलादेश, श्रीलंका,
अफगाणिस्तान, चीन, इरान, नेपाळ व भुटान या देशातील नागरिकांना भारतात स्थावर मालमत्ता
खरेदी करता येत नाही तथापि, भारतीय रिझर्व बँकेच्या पूर्व परवानगीने पाच वर्षापेक्षा जास्त नाही अशा मुदतीकरिता शेतजमीन
वगळता इतर स्थावर मालमत्ता भाडेपट्ट्याने घेता येऊ शकते.
तलाठी भाऊसाहेबांना एका नवीन कायद्याचे
ज्ञान मिळाले.
Comments