हक्कसोडपत्रानंतर वारस नोंद
७०. हक्कसोडपत्रानंतर वारस नोंद :
वाचा : मालमत्ता हस्तांतरण कायदा १८८२ ; मुंबई मुद्रांक कायदा १९५८ ; हिंदू वारसा कायदा १९५६ आणि २००५ ; महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १४९, १५०.
एक दिवस नवनियुक्त तलाठी भाऊसाहेबांनी
मंडलअधिकार्यांना विचारणा केली की,
समजा शंकरराव नावाचा खातेदार मयत
झाला त्याला वारस म्हणून त्यांची पत्नी पार्वती, तीन मुले- राजेंद्र, विजय आणि अनिल तसेच
दोन मुली- अलका आणि सुलोचना यांची नावे दाखल झाली.
काही दिवसानंतर अलका व सुलोचना यांनी
भावांच्या हक्कात हक्कसोडपत्र करुन दिले. कालांतराने पार्वती मयत झाली. आता वारस
नोंद करतांना अलका व सुलोचना यांची नावे पुन्हा पार्वतीचे वारस म्हणून दाखल
करायची का?
मंडलअधिकार्यांनी उत्तर दिले,
हक्कसोडपत्र म्हणजे कोणत्याही
एकत्र कुटुंबातील कोणत्याही सदस्याने, सहहिस्सेदाराने, त्याचा, त्या एकत्र
कुटुंबाच्या मिळकतीवरील, स्वत:च्या हिस्स्याचा वैयक्तिक हक्क, त्याच एकत्र
कुटुंबाच्या सदस्याच्या किंवा सहदायकाच्या लाभात, स्वेच्छेने आणि कायमस्वरुपी
सोडून दिल्याबाबत नोंदणीकृत दस्त म्हणजे हक्कसोडपत्र. एकत्र कुटुंबाचा कोणताही
स्त्री अथवा पुरुष सदस्य किंवा सहहिस्सेदार फक्त वारसहक्काने मिळालेल्या
किंवा मिळू शकणार्या एकत्र कुटुंबातील मिळकतीतील स्वत:च्या हिस्स्याच्या
मिळकतीपुरते हक्कसोडपत्र, त्याच एकत्र कुटुंबाच्या स्त्री अथवा पुरुष सदस्य
किंवा सहहिस्सेदार यांच्या लाभात करु शकतो.
आता तुमच्या उदाहरणाबाबत खुलासा असा
की, मयत शंकररावांच्या नावावर गावात एकच शेतजमीन होती. ते मयत झाल्यानंतर त्यांचे
वारस म्हणून त्यांची पत्नी पार्वती, तीन मुले- राजेंद्र,
विजय आणि अनिल तसेच दोन मुली- अलका
आणि सुलोचना यांची नावे दाखल झाली. काही दिवसानंतर अलका व सुलोचना यांनी भावांच्या
हक्कात हक्कसोडपत्र करुन दिले. कालांतराने पार्वती मयत झाली. आता वारस नोंद
करतांना पार्वतीचे वारस म्हणून राजेंद्र,
विजय आणि अनिल यांची नावे दाखल
करावीत आणि अलका आणि सुलोचना या दोन वारसांनी दिनांक ... /.../.... रोजी, राजेंद्र, विजय आणि अनिल या
भावांच्या हक्कात हक्कसोडपत्र करुन दिले आहे त्याची नोंद फेरफार क्रमांक .......
अन्वये नोंदविलेली आहे असे नमूद करावे.
आता दुसरे
उदाहरण- मयत शंकररावांच्या नावावर गावात तीन शेतजमिनी, एक घर आणि एक फार्महाऊस
होते. ते मयत झाल्यानंतर त्यांच्या उपरोक्त पाच मिळकतींना त्यांचे वारस म्हणून
त्यांची पत्नी पार्वती, तीन मुले- राजेंद्र,
विजय आणि अनिल तसेच दोन मुली- अलका
आणि सुलोचना यांची नावे दाखल झाली. काही दिवसानंतर अलका व सुलोचना यांनी भावांच्या
हक्कात हक्कसोडपत्र करुन दिले. या हक्कसोड पत्राची नोंद करतांना, अलका व सुलोचना
यांनी उपरोक्त कोणकोणत्या मिळकतींवरील हक्क सोडला आहे याची सविस्तर नोंद घ्यावी.
जरूर तर ज्या मिळकतींवरील हक्क सोडलेला नाही त्याबाबत स्पष्टपणे नमूद करावे. कालांतराने
पार्वती मयत झाली. आता वारस नोंद करतांना पार्वतीचे वारस म्हणून राजेंद्र, विजय आणि अनिल यांची
नावे दाखल करावीत आणि अलका आणि सुलोचना या दोन वारसांनी दिनांक ... /.../.... रोजी,
राजेंद्र, विजय
आणि अनिल या भावांच्या हक्कात ....., ......, या मिळकतींवरील हक्कसोडपत्र करुन
दिले आहे, त्याची नोंद फेरफार क्रमांक ......., दिनांक ... /.../.... अन्वये
नोंदविलेली आहे. परंतु ....., या मिळकतीबाबत अलका आणि सुलोचना त्यांनी हक्कसोडपत्र
करुन दिलेले नाही.
त्यामुळे हक्कसोडपत्र करुन न दिलेल्या
......... या मिळकतीवर राजेंद्र, विजय आणि अनिल तसेच अलका आणि सुलोचना यांचे नाव पर्वतीचे वारस
म्हणून दाखल केले आहे असे नमूद करावे.
तलाठी भाऊसाहेबांच्या प्रश्नाला
समाधानकारक उत्तर मिळाले.
Comments