नोटीसीवर सही करण्यास टाळाटाळ करणारा खरेदी देणार
३८.
नोटीसीवर सही करण्यास टाळाटाळ करणारा खरेदी देणार :
वाचा : मालमत्ता हस्तांतरण कायदा १८८२ ; महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १४९ व १५०.
मनोजने त्याच्या मालकीची शेतजमीन अभयला
विकत दिली. या नोंदणीकृत व्यवहाराची कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर तलाठी यांनी गाव
नमुना ६ मध्ये त्याची नोंद घेतली. सर्व हितसंबंधीतांना नोटीस बजावली.
नोटीस मिळाल्यानंतर अभयने मुदतीत
तलाठी यांच्याकडे येऊन नोटीसीवर सही केली. मनोज गैरहजर राहिला. काही दिवसांनी
तलाठी भाऊसाहेबांनी मनोजला पुन्हा पोहोच-देय डाकेने नोटीस बजावली. त्या नोटीसीची पोहोच
तलाठी कार्यालयात प्राप्त झाली परंतु मनोज नोटीस पुस्तकावर सही करण्यासाठी आला
नाही त्यामुळे नोंद प्रलंबित राहीली.
अभयने याबाबत मंडलअधिकार्याकडे
विचारणा केली. तेव्हा त्यांनी तलाठी भाऊसाहेबांना नोटीसीची पोहोच प्राप्त झाली
की नाही याबाबत विचारणा केली. तलाठी भाऊसाहेबांनी पोहोच प्राप्त झाल्याची माहिती
दिली.
मंडलअधिकारी यांनी संबंधीत दस्तऐवज
कायदेशीर असल्याची आणि नोंदणीकृत दस्तावर मनोजची स्वाक्षरी असल्याची खात्री केली,
पोहोच प्राप्त झाली म्हणजे नोटीस बजावली गेली आहे याची खात्री केली तसेच मनोजने मंडलअधिकारी
किंवा तहसिलदार कार्यालयात सदर व्यवहाराविरूध्द तक्रार दाखल केली नाही यांचीही खात्री
केली. पोहोच प्राप्त
झाल्याचा पुरावा नोटीस बजावल्याचा पुरावा म्हणून गृहीत धरावा असे निर्णय अनेक
न्यायालयांनी दिले आहेत. तशा आशयाचा
शेरा गाव नमुना ६ मध्ये नोंदवून ती नोंद प्रमाणीत केली.
मंडलअधिकारी यांनी तलाठी भाऊसाहेबांना माहिती दिली की, अशा व्यवहारात खरेदी देणार यांना नोटीस बजावली जाणे महत्वाचे आहे. नोटीस बजावली गेली असल्यास वरील प्रमाणे खात्री करून नोंद प्रमाणीत करता येते.
Comments