दस्तात लेखन-प्रमाद असलेली नोंद

 


३७. दस्तात लेखन-प्रमाद असलेली नोंद :

 

वाचा : महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६,कलम १४९, १५० ; मालमत्ता हस्तांतरण कायदा १८८२ ; नोंदणी कायदा कलम ८१.

 

सखारामने त्‍याची स्‍वकष्‍टार्जित शेतजमीन महेश्‍वरला विकत दिली. या नोंदणीकृत व्यवहाराची कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर तलाठी यांनी गाव नमुना ६ मध्ये त्याची नोंद घेतली. सर्व हितसंबंधीतांना नोटीस बजावली.

एक दिवस महेश्‍वर तलाठी भाऊसाहेबांकडे आला आणि विनंती केली की, दस्तात त्‍याचे नाव चुकून महेश्‍वरच्‍या ऐवजी गणेश्‍वर असे लिहिले गेले आहे तसेच त्‍याने खरेदी केलेल्या जमिनीचा भूमापन क्रमांक चुकीचा नोंदवला गेला आहे. तो तुम्‍ही तुमच्याच स्तरावर दुरुस्त करून घ्यावा.

असे करणे कितपत कायदेशीर आहे याबाबत तलाठी भाऊसाहेबांना खात्री नव्‍हती. त्‍यांनी मंडलअधिकार्‍यांना विचारल्‍याशिवाय तसे न करण्‍याचा निर्णय घेतला.

मंडलअधिकारी आल्‍यानंतर तलाठी भाऊसाहेबांनी त्‍यांना याबाबत विचारले.

मंडलअधिकारी म्‍हणाले,

"महेश्‍वरची विनंती मान्‍य करणे अत्‍यंत बेकायदेशीर आहे.

नोंदणीकृत दस्त हा मूळ आणि कायम पुरावा आहे त्यामुळे त्यात काही चूक असल्यास चूक दुरुस्तीचा दस्त करणेच आवश्यक आहे. तलाठी स्तरावर अशी चूक दुरूस्त करणे बेकायदेशीर आहे. नोंदणी कायदा कलम ८१ अन्‍वये नोंदणी कायद्‍यान्‍वये सादर केलेल्‍या किंवा निक्षेपित केलेल्‍या कोणत्‍याही दस्‍तऐवजाचे पृष्‍ठांकन, अनुवाद किंवा नोंदणी मुद्‍दाम अशुध्‍द केल्‍यास तो भारतीय दंड संहिता अन्‍वये गुन्‍हा ठरतो. त्‍यामुळे महेश्‍वरला, चूक दुरुस्तीचा दस्त करण्‍याचा सल्‍ला देणे योग्‍य आणि कायदेशीर ठरेल.

जरी, महेश्‍वरच्‍या लक्षात ही चूक आली नसती तरीही मी सदर नोंद चूक दुरूस्तीचा दस्त करण्याचा शेरा लिहून रद्द केली असती."  

Comments

Archive

Contact Form

Send