लेखन प्रमादाची दुरूस्ती
५७.
लेखन प्रमादाची दुरूस्ती :
वाचा : महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १४९, १५०, १५५.
पोपटरावांनी त्यांची स्वकष्टार्जित
शेतजमीन शशीकांतला विकत दिली. या नोंदणीकृत व्यवहाराची कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर
तलाठी यांनी गाव नमुना ६ मध्ये त्याची नोंद घेतली.
सर्व हितसंबंधीतांना नोटीस बजावली. मुदतीनंतर सदर नोंद
प्रमाणित झाली.
एक दिवस शशीकांत तलाठी भाऊसाहेबांकडे
आला आणि विनंती केली की, फेरफार नोंदीत त्याचे नाव चुकून शशीकांतच्या ऐवजी रविकांत
असे लिहिले गेले आहे. तसेच त्याने खरेदी केलेल्या जमिनीचा भूमापन क्रमांक चुकीचा नोंदवला
गेला आहे. परंतु
नोंदणीकृत दस्तात त्याचे नाव शशीकांत असेच आहे आणि त्याने खरेदी केलेल्या जमिनीचा
भूमापन क्रमांक योग्य लिहिलेला आहे. त्यामुळे दस्तावरील योग्य नोंदी तुम्ही
तुमच्याच स्तरावर फेरफारमध्ये दुरुस्त करून घ्याव्या.
असे करणे कितपत कायदेशीर आहे याबाबत
तलाठी भाऊसाहेबांना खात्री नव्हती. त्यांनी मंडलअधिकार्यांना विचारल्याशिवाय
तसे न करण्याचा निर्णय घेतला.
मंडलअधिकारी आल्यानंतर तलाठी
भाऊसाहेबांनी त्यांना याबाबत विचारले.
मंडलअधिकारी म्हणाले, ही चूक जरी
आपल्या स्तरावर झाली असेल तरीही एकदा फेरफारावर निर्णय झाल्यानंतर त्यात
कोणताही फेरबदल करणे अत्यंत बेकायदेशीर आहे.
परंतु महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम
१९६६, कलम १५५ अन्वये तहसिलदारांना लेखन प्रमाद दुरूस्त करण्याचे अधिकार आहेत.
शशीकांतने, जमीन महसूल अधिनियम १९६६,
कलम १५५ अन्वये तहसिलदारांकडे लेखन प्रमाद दुरूस्तीसाठी अर्ज करावा आणि
नोंदणीकृत दस्तातील योग्य मजकूर आणि फेरफारातील चूक निदर्शनास आणावी.
तहसिलदारांचा आदेश प्राप्त झाल्यानंतर, त्यानुसार नवीन फेरफार नोंदवून ही चूक
दुरूस्त करता येईल.
तलाठी भाऊसाहेबांनी, मंडलअधिकार्यांच्या सुचनेनुसार, शाशीकांतला निरोप देण्याची व्यवस्था केली.
Comments