पतीचा पत्‍नीच्‍या जमिनीवर कुळ म्‍हणून दावा

 


५८. पतीचा पत्‍नीच्‍या जमिनीवर कुळ म्‍हणून दावा :

 

वाचा : महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, कलम ४.

 

इंदिराबाईंच्‍या नावे गावी स्‍वकष्‍टार्जित शेतजमीन होती. इंदिराबाईंचे पती सुरेंद्र त्‍या जमिनीमध्‍ये अनेक वर्षे वहिवाट करीत होते.

एकदा सुरेंद्र तलाठी कार्यालयात आले आणि त्‍यांनी, ते वहिवाटत असलेल्‍या त्‍यांच्‍या पत्‍नीच्‍या जमिनीवर त्‍यांचे नाव कुळ म्‍हणून दाखल करावे असा अर्ज दिला.

तलाठी भाऊसाहेब नवीनच खात्‍यात रूजु झाले होते. त्‍यांनी सुरेंद्रच्‍या अर्जाप्रमाणे गाव नमुना ६ मध्‍ये नोंद लिहिण्‍याची तयारी सुरू केली तेवढ्‍यात मंडलअधिकार्‍यांचे आगमन झाले. मंडलअधिकार्‍यांनी सहज चौकशी केली तेव्‍हा तलाठी भाऊसाहेबांनी सुरेंद्रच्‍या अर्जाबाबत आणि त्‍याचा अर्जाप्रमाणे नोंद लिहिण्‍याची तयारी सुरू केली होती त्‍याबाबत सांगितले.

मंडलअधिकारी म्‍हणाले, मी योग्‍य वेळी आलो, तुम्‍ही फार मोठी चूक करीत होता.

एकतर कोणाच्‍याही फक्‍त अर्जावरुन गाव नमुना ६ मध्‍ये नोंद करता येत नाही. अशी नोंद करण्‍यासाठी नोंदणीकृत दस्‍त असणे आवश्‍यक आहे.

दुसरे म्‍हणजे महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियमानुसार नातेवाईक कुळ ठरू शकत नाही.

महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, कलम ४ मध्‍ये कुळाची व्‍याख्‍या दिलेली आहे. त्‍याचा आशय खालील प्रमाणे

कुळ म्हणजे

१. शेतजमिनीचा मालक, जर स्‍वत: जमीन कसत नसेल आणि त्‍याच्‍यावतीने, अन्‍य व्‍यक्‍ती अशा मालकाची शेतजमीन वैध आणि कायदेशीररित्या व्‍यक्‍तीश: कसत असेल आणि जर अशी अन्‍य व्‍यक्‍ती, (अ) जमीन मालकाच्या कुटुंबातील सदस्‍य नसावी आणि

(ब) जमीन मालक आणि अशा व्‍यक्‍तीत जमीन कसण्‍यासंबंधी करार झाला असावा, जर असा करार तोंडी असेल तर तो न्यायालयात सिध्द होण्‍यास पात्र असावा.

(क) अशा अन्‍य व्‍यक्‍तीने ती जमीन प्रत्यक्ष स्वत: कसली पाहिजे.

(ड) जमीन कसण्याच्या बदल्यात अशा कुळाने जमीन मालकास नियमितपणे खंड दिला पाहिजे आणि जमीन मालकाने तो खंड स्वीकारला पाहिजे.

(इ) अशा व्यक्तीकडे ती जमीन गहाण नसावी.

(फ) अशी व्यक्ती पगारावर ठेवलेला नोकर नसावी.

(ऋ) अशी व्यक्ती जमीन मालकाच्या किंवा जमीन मालकाच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या देखरेखीखाली जमीन कसत नसावी.

खालील व्‍यक्‍ती शेतजमिनीत वहिवाट करत असतील तरी त्‍या शेतजमिनीवर जमीन मालकाचा 'प्रत्‍यक्ष ताबा' आहे असे कायदा मानतो.    

अ. जमिनीचा मालक किंवा त्‍याचे कुटुंबीय

आ. कुळ कायद्‍यानुसार असलेले कुळ

इ. वरील व्‍यक्‍तीशिवाय अशी इतर व्‍यक्‍ती जी कायदेशीर कागदोपत्री पुराव्‍याद्वारे स्‍वत:च्‍या वहिवाटीचे समर्थन करू शकेल.

 आजही एक वर्ष जमिनीची वहिवाट करणारा इसम जर, (अ) वहिवाटदार व मालक यांच्‍यात करार झाला असेल (ब) तो जमीन मालकाच्‍यावतीने जमीन कसत असेल (क) तो मालकाला खंड देत असेल (ड) त्‍या दोघात जमीन मालक आणि कुळ असे संबंध असतील अशा प्रकारे कुळाच्या व्याख्‍येतील अटींची पूर्तता करित असेल तर तो कुळ कायदा कलम ३२-ओ अन्‍वये कुळ असल्याचा दावा करु शकतो.

परंतु अशा व्‍यक्‍तीने तलाठी कार्यालयात अर्ज करून उपयोग नसतो. कुळ ठरविण्‍याचे अधिकार फक्‍त तहसिलदार यांना आहेत.

पत्‍नीच्‍या नावे असणारी जमीन पती वहिवाटत असेल तर तो कुळ ठरणार नाही या अर्थाचा निकाल अप्‍पालाल उर्फ इस्‍माईल इब्राहम वि. आबा गिराज मुल्‍ला (१९९९, खंड १०१(३) बॉम्‍बे एल. आर. ३८८) या प्रकरणात दिला गेला आहे. त्‍यामुळे सुरेंद्रच्‍या अर्जाची नोंद करण्‍याचे कारण नाही. जरुर तर त्‍याला बोलावून कुळ कायद्‍यातील तरतुदी समजवून सांगा.

तलाठी भाऊसाहेबांना त्‍याची चूक लक्षात आली. 

Comments

Emotions
Copy and paste emojis inside comment box

Archive

Contact Form

Send