धौत जमिनीच्‍या आकारणीत कपातीची नोंद

 


५९. धौत जमिनीच्‍या आकारणीत कपातीची नोंद :

 

वाचा : महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम ६६ ; महाराष्ट्र जमीन महसूल (मळईची जमीन व धौत जमीन) नियम १९६७.

 

दशरथरावांची जमीन नदीच्‍या किनारी होती. नदीला आलेल्‍या पुरामुळे त्‍यांच्‍या जमिनीच्‍या एकूण क्षेत्रापैकी अर्धा एकर क्षेत्र वाहून गेले. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम ६६ अन्‍वये याप्रकारे जमिनीचे क्षेत्र कमी झाले तर अशा जमिनीच्‍या आकारणीत कपात करण्‍याचे अधिकार जिल्‍हाधिकार्‍यांना आहेत. दशरथरावांना जिल्‍हाधिकार्‍यांकडून आकारणीत कपात करण्‍याचा आदेश प्राप्‍त झाला होता. तो त्‍यांनी तलाठ्‍याकडे आणून दिल्‍यानंतर नवनियुक्‍त तलाठ्‍याने त्‍याची नोंद गाव नमुना ६ मध्ये त्याची नोंद घेतली.

मंडलअधिकारी आल्‍यानंतर नवनियुक्‍त तलाठ्‍याने मंडलअधिकार्‍यांना धौत जमिनीबाबतची माहिती त्‍यांना विचारली.

मंडलअधिकार्‍यांनी खुलासा केला की, नदीपात्रालगत असणार्‍या शेतजमिनीचे अर्धा एकरपेक्षा कमी नसेल असे क्षेत्र जर नदीला आलेल्‍या पुरामुळे वाहून गेल्‍याने, किंवा धुपेमुळे कमी झाले असेल तर अशा क्षेत्राच्‍या आकारणीत कपात करण्‍याचा आदेश काढण्‍याचा अधिकार जिल्‍हाधिकार्‍यांना आहे. जर अशी जमीन पुन्‍हा प्रकट झाली आणि तिचे क्षेत्र अर्धा एकरपेक्षा जास्‍त असेल तर अशा क्षेत्रावर पुन्‍हा आकारणी बसविण्‍याचे अधिकारही जिल्‍हाधिकार्‍यांना आहेत.    

नदीला आलेल्‍या पुरामुळे दशरथरावांच्‍या जमिनीच्‍या एकूण क्षेत्रापैकी अर्धा एकर क्षेत्र वाहून गेले त्‍यामुळे जिल्‍हाधिकार्‍यांनी सदरचा आदेश दिला आहे. जिल्‍हाधिकार्‍यांचा आदेश असल्‍यामुळे त्‍याला नोटीस काढण्‍याचा आवश्‍यकता नाही. फेरफार लगेच मंजुरीसाठी ठेवा.  

Comments

Archive

Contact Form

Send