दोन मृत्यूपत्रांची नोंद

 


. दोन मृत्यूपत्रांची नोंद :

 

वाचा : भारतीय वारसा कायदा १९२५, कलम २ ; हिंदू उत्तराधिकार अधिनियम-१९५६; महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १४९

 

बाजीराव नावाचे गावातील खातेदार दिनांक १५ सप्‍टेंबर २०१३ रोजी मयत झाले. त्यांच्या हयातीत त्यांनी भारतीय वारसा कायदा १९२५, कलम २ अन्‍वये त्याच्या मालमत्तेचे दिनांक १२ जुन २०१३ रोजी केलेले मृत्यूपत्र आणि वारस नोंदीची कागदपत्रे त्‍यांचा मुलगा संतोष घेऊन आल्‍यावर तलाठी भाऊसाहेबांनी त्‍यानुसार गाव नमुना ६ क मध्ये नोंद घेतली. दुसर्‍या दिवशी मयत बाजीराव यांचा पुतण्‍या अशोक, मयत बाजीरावांनी दिनांक ११ जानेवारी २०१३ रोजी केलेले मृत्यूपत्र घेऊन तलाठी भाऊसाहेबांकडे आला आणि त्‍या मृत्यूपत्रानुसार मयत बाजीरावांची सर्व मिळकत त्‍याच्‍या नावावर करण्‍याची विनंती केली. त्‍यावर संतोषने हरकत दाखल केली.

तलाठी भाऊसाहेबांनी संतोषला तक्रारीची पोहोच नमुना १० मध्ये दिली. त्यानंतर ती तक्रार गाव नमुना ६-अ मध्ये नोंदवली आणि संबंधीत ६ क मध्ये पेन्सिलनेतक्रारअसे संदर्भासाठी लिहून ठेवले.

मंडलअधिकारी चावडीला भेट देण्यास आले तेव्हा तलाठी यांनी ही तक्रार त्यांच्‍या निदर्शनास आणली. मंडलअधिकारी यांनी नमुना १२ मध्ये सर्व हितसंबंधीतांना नोटीस देऊन पंधरा दिवसानंतर सर्वांना त्याच चावडीत, पुराव्याच्या कागदपत्रांसह हजर ठेवण्याचे निर्देश तलाठी यांनी दिले.

सुनावणीच्या दिवशी संतोष आणि अशोकने त्‍यांचे म्‍हणणे मांडले आणि स्‍वत:कडे असलेले मृत्‍यूपत्र खरे आहे असा दावा दोघांनीही केला.

मंडलअधिकारी यांनी त्‍यांच्‍या निकालपत्रात ' भारतीय वारसा कायदा, १९२५, कलम- ६२ अन्वये

मृत्युपत्र करणारी व्‍यक्‍ती, त्‍याने केलेले मृत्युपत्र रद्‍द करु शकते किंवा त्‍यात कितीही वेळा बदल किंवा दुरुस्‍ती करू शकते. एकाच व्‍यक्‍तीने, एकापेक्षा जास्‍त मृत्यूपत्र कलेली असली तरी त्‍याने सर्वात शेवटच्‍या दिनांकास केलेले मृत्यूपत्र ग्राह्‍य मानले जाते.' या भारतीय वारसा कायदा १९२५ मधील तरतुदीचा आधार घेऊन मयत बाजीरावांनी दिनांक १२ जुन २०१३ रोजी केलेले शेवटचे मृत्यूपत्र ग्राह्‍य मानण्‍यात येत आहे असा निकाल दिला.


Comments

Archive

Contact Form

Send