मृत्यूपत्रातील विसंगत प्रदानांची नोंद

 


६१. मृत्यूपत्रातील विसंगत प्रदानांची नोंद :

 

वाचा : भारतीय वारसा कायदा १९२५, कलम २, ८८ ; हिंदू उत्तराधिकार अधिनियम-१९५६ ; महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १४९.

 

गोपाळराराव हे खातेदार मयत झाले. त्याच्या हयातीत त्यांनी भारतीय वारसा कायदा १९२५, कलम २ अन्‍वये त्याच्या मालमत्तेचे मृत्यूपत्र करून ठेवले होते. वारस नोंदीची आणि मृत्यूपत्राबाबतची कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर तलाठी भाऊसाहेबांनी अर्जानुसार गाव नमुना ६ क मध्ये नोंद घेतली. गोपाळरारावांनी त्‍यांच्‍या मृत्‍यूपत्रातील पहिल्‍या कलमामध्‍ये, त्‍यांचे मौजे पिराचीवाडी या ठिकाणी असणारी शेतजमीन, त्‍यांचा मोठा मुलगा रावजी याला द्‍यावे असे नमूद केले होते आणि त्‍याच मृत्‍यूपत्रात, शेवटच्‍या कलमामध्‍ये असे नमूद केले होते की, त्‍यांचे पिराचीवाडी या ठिकाणी असणारे शेत विकुन टाकावे आणि येणार्‍या रक्‍कमेचा विनियोग त्‍यांचा लहान मुलगा सावजी याच्‍या शिक्षणासाठी करण्‍यात यावा. 

तलाठी यांनी स्थानिक चौकशी केली आणि अर्जात नमूद सर्व वारसांच्‍या नावाने वारस ठराव मंजूर झाल्‍यानंतर गाव नमुना ६ मध्ये त्याची नोंद करून सर्व हितसंबंधीतांना नोटीस बजावली.

नोटीस मिळाल्यावर मयत गोपाळरावांचा मोठा मुलगा रावजी तलाठी यांच्‍याकडे आला आणि गोपाळरावांनी केलेल्‍या मृत्‍यूपत्रातील पिराचीवाडी या ठिकाणी असणार्‍या शेताच्‍या कलमाबाबत हरकत दाखल केली.

तलाठी भाऊसाहेबांनी त्‍याला तक्रारीची पोहोच नमुना १० मध्ये दिली. त्यानंतर ती तक्रार गाव नमुना ६-अ मध्ये नोंदवली. मंडलअधिकारी चावडीला भेट देण्यास आले तेव्हा तलाठी यांनी ही तक्रार त्यांच्‍या निदर्शनास आणली. मंडलअधिकारी यांनी नमुना १२ मध्ये सर्व हितसंबंधीतांना नोटीस देऊन पंधरा दिवसानंतर सर्वांना त्याच चावडीत, पुराव्याच्या कागदपत्रांसह हजर ठेवण्याचे निर्देश तलाठी यांनी दिले.

सुनावणीच्या दिवशी रावजीने त्‍याचे म्‍हणणे दाखल केले की, मयत गोपाळरारावांनी त्‍यांच्‍या मृत्‍यूपत्रातील पहिल्‍या कलमामध्‍ये, त्‍यांचे मौजे पिराचीवाडी या ठिकाणी असणारे शेत रावजी याला द्‍यावे असे नमूद केले होते आणि त्‍याच मृत्‍यूपत्रात, शेवटच्‍या कलमामध्‍ये नमूद केले की, त्‍यांचे पिराचीवाडी या ठिकाणी असणारे शेत विकुन टाकावे आणि येणार्‍या रक्‍कमेचा विनियोग सावजी याच्‍या शिक्षणासाठी करण्‍यात यावा ही बाब अयोग्‍य आहे. या दोन्‍ही गोष्‍टी एकत्र करणे शक्‍य नसल्‍याने ही दोन्‍ही कलमे विसंगत ठरतात. त्‍यामुळे मयत गोपाळरारावांचा मोठा मुलगा या नात्‍याने ते शेत त्‍याला देण्‍यात यावे.

सावजीने त्‍याचे म्‍हणणे दाखल केले की, मयत गोपाळरारावांनी त्‍यांच्‍या मृत्‍यूपत्रानुसार त्‍यांचे पिराचीवाडी या ठिकाणी असणारे शेत विकुन, येणार्‍या रक्‍कमेचा विनियोग त्‍याच्‍या शिक्षणासाठी करण्‍यात यावा.      

मंडलअधिकारी यांनी त्‍यांच्‍या निकालपत्रात नमूद केले की,

"भारतीय वारसा कायदा, १९२५, कलम ८८ अन्‍वये मृत्‍यूपत्र करणार्‍या व्‍यक्‍तीने त्‍याच्‍या मृत्‍यूपत्रात केलेल्‍या विधानांची दोन कलमे विसंगत ठरत असतील आणि दोन्‍ही गोष्‍टी एकत्र करणे शक्‍य नसल्‍यास शेवटचे कलम विधिग्राह्‍य ठरते. त्‍यामुळे मयत गोपाळरारावांच्‍या मृत्‍यूपत्रातील शेवटचे कलम विधिग्राह्‍य ठरुन, त्‍यांचे पिराचीवाडी या ठिकाणी असणारे शेत विकुन, येणार्‍या रक्‍कमेचा विनियोग मयत गोपाळरावांचा लहान मुलगा सावजी याच्‍या शिक्षणासाठी करण्‍यात यावा. ही बाब विधिग्राह्‍य ठरवून त्‍यानूसार सदर शेतजमीन सावजीच्‍या नावे  करण्‍यात येत आहे." 

Comments

Archive

Contact Form

Send