मृत्यूपत्राचा साक्षीदारच वारस आणि व्यवस्थापक
६२. मृत्यूपत्राचा साक्षीदारच वारस आणि व्यवस्थापक :
वाचा : भारतीय वारसा कायदा १९२५,
कलम २, ६८ ; हिंदू उत्तराधिकार अधिनियम-१९५६ ; महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १४९.
भगवंतराव हे खातेदार मयत झाले. त्याच्या हयातीत त्यांनी
भारतीय वारसा कायदा १९२५, कलम २ अन्वये त्याच्या मालमत्तेचे मृत्यूपत्र करून ठेवले होते. वारस नोंदीची आणि
मृत्यूपत्राबाबतची कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर तलाठी भाऊसाहेबांनी अर्जानुसार
गाव नमुना ६ क मध्ये नोंद घेतली. भगवंतरावांनी त्यांच्या मृत्यूपत्रात त्यांचा
मोठा मुलगा शेखर याला वारस म्हणून त्याचा हिस्सा
प्रदान केला होताच तसेच त्याला त्यांच्या मृत्यूपत्राचा व्यवस्थापक (Executor) म्हणून नेमले होते आणि शेखर
हा भगवंतरावांच्या मृत्यूपत्रावर स्वाक्षरी
करणार्या साक्षीदारांपैकी एक साक्षीदार सुध्दा होता.
तलाठी यांनी स्थानिक चौकशी केली मृत्यूपत्रात
नमूद सर्व वारसांच्या नावाने वारस ठराव मंजूर झाल्यानंतर गाव नमुना ६ मध्ये त्याची
नोंद करून सर्व हितसंबंधीतांना नोटीस बजावली.
नोटीस मिळाल्यावर मयत भगवंतरावांची
मुलगी शारदा, तलाठी यांच्याकडे आली आणि भगवंत गोपाळरावांनी केलेल्या मृत्यूपत्रात
शेखर वारस असून तोच व्यवस्थापक आणि साक्षीदार असल्याबाबत
संशय व्यक्त केला.
तलाठी भाऊसाहेबांनी शारदाला भारतीय वारसा
कायदा १९२५ यातील कलम ६८ ची तरतुद वाचायला दिली ज्यात स्पष्टपणे नमूद होते की,
"कोणत्याही मृत्यूपत्रावर
साक्षीदार म्हणून स्वाक्षरी करणार्या व्यक्तीला, त्या मृत्यूपत्रात नमूद
संपत्तीत वाटा मिळत असल्यास आणि अशा साक्षीदार व्यक्तीला, मृत्यूपत्र करणार्या
व्यक्तीने मृत्यूपत्राचा व्यवस्थापक (Executor) म्हणून नेमलेले असले
तरी तिच्या साक्षीदार असण्यावर परिणाम होणार नाही."
कायद्यातील तरतुद वाचल्यानंतर
शारदाचे समाधान झाले.
Comments