आणेवारीनुसार क्षेत्राची नोंद

 


६३. आणेवारीनुसार क्षेत्राची नोंद :

 

वाचा : महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १४९, १५०

 

गावात अप्‍पासाहेबांचे १ हेक्टर २० आर क्षेत्र होते त्‍यातील चार आणे हिस्‍सा त्‍यांनी सोमनाथला विकला. या व्‍यवहाराची कागदपत्रे प्राप्‍त झाल्‍यानंतर नवनियुक्‍त तलाठ्‍याने त्‍याची नोंद गाव नमुना ६ मध्ये त्याची नोंद घेण्‍यासाठी कागदपत्रे वाचली. परंतु १ हेक्टर २० आर क्षेत्रातील चार आणे हिस्‍सा हेक्टर-आर मध्‍ये कसा काढायचा हे तलाठी भाऊसाहेबांना कळत नव्‍हते, अनेक प्रकारची गणिते करून त्‍यांना वैताग आला होता. 

तेवढ्‍यात एक सेवानिवृत्त मंडलअधिकारी त्‍यांच्‍या खाजगी कामानिमित्त चावडीवर आले. नवनियुक्‍त तलाठी भाऊसाहेबांनी त्‍यांच्‍याकडे आणेवारीबाबत जाणून घेण्‍याची विनंती केली.

सेवानिवृत्त मंडलअधिकार्‍यांनी सांगण्‍यास सुरूवात केली,

महसूल खात्‍यावर अनेक वर्षे प्राचीन चलन व्‍यवस्‍थेचा प्रभाव राहिला आहे त्‍यामुळे बर्‍याच सात-बारा उतार्‍यांवर व्यक्तीच्या नावासमोर 'चार आणे क्षेत्र', 'आठ आणे क्षेत्र', 'दोन आणे चार पै' क्षेत्र इत्यादी लिहिलेले आढळते. याला महसुली भाषेत 'आणेवारी' म्हणतात. 'आणेवारी'चा उल्‍लेख कायद्‍यात कुठेही नाही परंतु त्‍या त्‍या वेळेच्‍या चलन प्रथेप्रमाणे फक्त अर्जावरुन काही ठिकाणी अशी 'आणेवारी' दाखल असल्याची नोंद आढळते जे अवैध आहे. तहसिलदार यांनी योग्य ती चौकशी करुन महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम ८५ अन्वये वाटपाच्‍या आदेशानुसार क्षेत्र दाखल होणे कायदेशीर आहे. तथापि, फक्‍त 'आणेवारी' दाखल झाली म्‍हणजे वाटप झाले असा होत नाही.  

जमिनीच्या सात-बारा उतार्‍यावर 'आणेवारी' दाखल करण्‍याची पध्दत ब्रिटीश काळात अँडरसनच्या कारकिर्दीत रुढ झाली असे म्हटले जाते. प्राचीन अर्थक्षेत्रातील व्यवहारात प्रचलीत 'आणे-पै' पध्दतीचा यावर प्रभाव आहे. महसूल खात्यात प्रचलीत या पध्दतीनुसार,

एक आणा म्हणजे बारा पैसे; सोळा आणे म्हणजे एक रुपया; १९२ पैसे म्हणजे १६ आणे; म्हणजेच एक रुपया.

'आणे' ( ) या चिन्हाने (एक उलटा स्‍वल्‍पपविराम) दर्शविले जातात आणि 'पै' ( ‘‘ ) या चिन्हाने (दोन उलटे स्‍वल्‍पविराम) चिन्हाने दर्शविले जातात.

उदाहरणार्थ

१२ म्‍हणजे बारा आणे, [एक चिन्‍ह, त्‍यानंतर अंक – आणे दर्शवते]

म्‍हणजे दोन आणे सहा पै. [एक चिन्‍ह, त्‍यानंतर अंक, पुन्‍हा एक चिन्‍ह आणि पुन्‍हा अंक असे लिहिले असेल तर पहिले चिन्‍ह आणे आणि नंतरचे चिन्‍ह पै दर्शविते.]

‘‘ म्‍हणजे चार पै. [दोन सलग चिन्‍हे, त्‍यानंतर अंक - पै दर्शविते.]

 

'आणेवारी' काढण्‍याचे सुत्र :

 जमिनीचे एकुण क्षेत्रफळ x दर्शविलेली आणेवारी (आण्‍याचे पै मध्‍ये रुपांतरण करून पै. मध्ये) ÷ १९२  या सुत्राने क्षेत्र काढले जाते. 

दशमान पध्दत अंमलात आल्यानंतर जमिनीबाबत चाळीस गुंठ्याचा एक एकर आणि शंभर गुंठ्याचा एक हेक्टर असे समीकरण झाले. मेट्रीक पध्दतीतगुंठाया ऐवजीआरअसे मोजमाप रुढ झाले. परंतु मेट्रीक पध्दतीचे मोजमाप दशमान पध्दतीत बसवतांना गुंठ्यापेक्षाआरचे क्षेत्र पाच चौरस फुटाने कमी येते. जमिनीच्या क्षेत्राची वाटणी दशमान पध्दतीने करणे अवघड असल्याने 'आणे-पै' पध्दत तशीच सुरु राहीली. 'आणे-पै' पध्दतीनुसार जमिनीचे क्षेत्र कितीही असले तरी ते १९२ पैसे म्हणजे १६ आणे म्हणजेच एक रुपया मानले जाते.

तलाठी भाऊसाहेबांनी, अप्‍पासाहेबांचा व्‍यवहार त्‍यांना सांगितल्‍यावर ते म्‍हणाले, या व्‍यवहारात

अप्‍पासाहेबांचे एकूण क्षेत्र १ हेक्टर २० आर आहे त्‍यातील चार आणे हिस्‍सा त्‍यांनी सोमनाथला विकला. म्‍हणून प्रथम चार आण्याचे 'पै' मध्ये रुपांतरण करावे. (एक आणा म्‍हणजे १२ पैसे म्हणून १२ पैसे गुणिले ४ आणे म्‍हणजे ४८ पैसे) यानंतर १ हेक्टर २० आर क्षेत्र म्‍हणजे १२० आर म्हणून १२० (आर) गुणिले ४८ पैसे (४ आणे हिस्सा) भागिले १९२ पैसे (१६ आणे म्हणजेच एक रुपया) म्‍हणजे ३० (आर). म्हणजेच अप्‍पासाहेबांनी त्‍यांच्‍या १ हेक्टर २० आर क्षेत्रामधील चार आणे हिस्सा म्‍हणजेच ३० आर क्षेत्र सोमनाथला विकले आहे.

पूर्वी कुटुंबातील सर्व सदस्‍यांना समान वाटप करून सुध्दा २ किंवा ३ पै क्षेत्र शिल्लक राहील्यास प्रथा/परंपरेनुसार मोठ्या दोन किंवा तीन भावांना असे शिल्लक क्षेत्र, प्रत्येकी सम प्रमाणात वाटले जात होते.

सेवानिवृत्त मंडलअधिकार्‍यांनी नवनियुक्‍त तलाठी भाऊसाहेबांना आणेवारीबाबत सखोल ज्ञान दिले होते.


Comments

Archive

Contact Form

Send