बिनशेती आदेशाची नोंद
वाचा : महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १०९, १४९, १५०.
भास्कररावांनी त्यांच्या जमिनीच्या
एकूण २ एकर ४० आर क्षेत्रापैकी ४० आर क्षेत्राचा बिनशेती आदेश जिल्हाधिकारी कार्यालयातून आणून तलाठी यांच्याकडे
नोंद करणेकामी दिला.
तलाठी यांनी बिनशेती आदेशाची नोंद
यापूर्वी केली नव्हती त्यामुळे मंडलअधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली ती नोंद
करण्याचा निश्चय करून ते मंडलअधिकार्यांची प्रतिक्षा करु लागले.
मंडलअधिकारी आल्यानंतर त्यांनी सत्य
परिस्थिती कथन करून बिनशेती आदेशाची नोंद करण्याबाबत मार्गदर्शन करण्याची
विनंती केली. मंडलअधिकार्यांनी सांगतले की,
जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी,
उपविभागीय अधिकारी यांच्याकडून पारित झालेले बिनशेती आदेश प्रथम तहसिलदार
कार्यालयात पाठविले जातात. तलाठी यांनी खातेदाराकडून परस्पर बिनशेती आदेश घेऊन
नोंदी करण्याचे टाळावे.
तहसिलदार कार्यालयाने असा बिनशेती
आदेश सर्वप्रथम 'तालुका नमुना दोन' मध्ये नोंदविणे आवश्यक असते. त्यानंतर तालुका
नमुना दोन मधील नोंदींचा अनुक्रमांक सदर बिनशेती आदेशावर नमुद करुन हा आदेश
संबंधीत तलाठी यांचेकडे पाठविला जातो.
तलाठी यांनी तहसिलदार कार्यालयाकडून,
तालुका नमुना दोन मधील नोंदींचा अनुक्रमांक असलेल्या आदेशाचीच नोंद फेरफार सदरी
नोंदवावी. असा फेरफार प्रमाणित झाल्यानंतरच सात-बाराच्या 'इतर हक्कात'
"बिनशेती" अशी नोंद करावी. बिनशेती ही संपूर्ण क्षेत्रासाठी आहे किंवा
अंशत: क्षेत्राची आहे हे बिनचूक नमुद करावे.
बिनशेतीचा स्वतंत्र सात-बारा तयार
करावयाचा असल्यास भूमी अभिलेख विभागाकडून कमी जास्त पत्रक (क.जा.प.) प्राप्त
झाल्यानंतरच सक्षम अधिकार्याचा बिनशेती आदेश, क.जा.प. व सनद बघुनच करावा आणि क.जा.प.
नुसार 'गाव नमुना एक' ला दुरूस्ती करावी.
ओपन स्पेस व रस्ता यांच्या
क्षेत्रासाठी कब्जेदार सदरी स्थानिक प्राधिकरणाची नोंद करावी आणि ॲमिनिटी स्पेसच्या
क्षेत्रासाठी कब्जेदार सदरी मालकाच्या नावाची नोंद करावी.
उदाहरणार्थ: जर एखाद्या जमिनीचे
क्षेत्र ४० आर आहे आणि पूर्ण ४० आर क्षेत्राचा बिनशेती आदेश असल्यास फेरफार सदरी
बिनशेती आदेश क्रमांक, तालुका नमुना दोन मधील नोंदींचा अनुक्रमांक, क्षेत्राचे
विवरण म्हणजेच ओपन स्पेस, ॲमिनिटी स्पेस, रस्ता, रोड साईड मार्जिन यांचे क्षेत्र
व प्लॉटचे निव्वळ क्षेत्र नमुद करावे. त्यानंतर सात-बारा सदरी इतर हक्कात "बिनशेती"
अशी नोंद करावी.
जर एखाद्या जमिनीचे क्षेत्र ४० आर
आहे आणि फक्त २० आर क्षेत्राचा बिनशेती आदेश असल्यास फेरफार सदरी तसे नमुद करुन
बिनशेती आदेश क्रमांक, तालुका नमुना नं. २ मधील नोंदींचा अनुक्रमांक, क्षेत्राचे
विवरण म्हणजेच ओपन स्पेस, ॲमिनिटी स्पेस, रस्ता, रोड साईड मार्जिन यांचे
क्षेत्र व प्लॉटचे निव्वळ क्षेत्र नमुद करावे त्यानंतर सात-बारा सदरी इतर हक्कात
"बिनशेती" अशी नोंद करावी आणि बिनशेती जितक्या क्षेत्रासाठी आहे ते
क्षेत्र नमुद करावे.
तलाठी भाऊसाहेबांनी मंडलअधिकार्यांच्या मार्गदर्शनानुसार भास्कररावांना त्यांचा बिनशेती आदेश तहसिलदार कार्यालयात, तालुका नमुना २ मध्ये नोंदवून त्या नोंदींचा अनुक्रमांक नमुद करून आणण्याची विनंती केली.
Comments