सात-बारावरील क्षेत्रानुसार आकार काढणे
६५. सात-बारावरील क्षेत्रानुसार आकार
काढणे :
वाचा : महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १४९, १५०
रामभाऊ, गणपत आणि मारुती या तीन
खातेदारांच्या नावे भूमापन क्रमांक १९२ होता, ज्याचे एकुण क्षेत्र ७ हेक्टर २०
आर आणि एकुण आकार रु. १२.३५ असा होता. एकूण क्षेत्रापैकी रामभाऊच्या नावे ३ हेक्टर
८० आर क्षेत्र आहे, गणपतच्या नावे १ हेक्टर ५३ आर आणि मारुतीच्या नावे १ हेक्टर
८७ आर क्षेत्र होते.
रामभाऊला प्राप्त झालेल्या न्यायालयीन
आदेशानुसार, सामायीक क्षेत्रातून रामभाऊचे क्षेत्र वेगळे करुन त्यांच्या नावे स्वतंत्र
सात-बारा देणे तलाठी यांना भाग होते.
परंतु सामायीक आकारातून रामभाऊ पुरता
स्वतंत्र आकार कसा काढावा हे तलाठी भाऊसाहेबांना माहित नव्हते.
मंडलअधिकारी आल्यानंतर त्यांनी त्यांची
अडचण कथन करून सामायीक आकारातून एका व्यक्ती पुरता स्वतंत्र आकार कसा काढावा
याबाबत मार्गदर्शन करण्याची विनंती केली. मंडलअधिकार्यांनी सांगतले की,
अनेक वेळा तलाठ्यांना खरेदीची नोंद
करतांना, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम ८५ अन्वये असलेल्या आदेशाचा
अंमल देतांना अथवा न्यायालयीन आदेशानुसार शेत जमीनीच्या सहधारकांमध्ये झालेल्या
वाटपाची नोंद घ्यावी लागते. अशा वेळेस संबंधित व्यक्तीपुरता आकार वेगळा
दर्शविणे व सदर आकाराची नोंद गाव नमुना आठ-अ ला नोंदविणे यात अडचण येते.
प्रत्येक सात-बारा सदरी एकुण आकार
नमुद असतो. सदर आकार आकारबंधानूसार ठरलेला असतो. या आकारात बदल करण्याचा अधिकार
तलाठी यांना नसतो तथापि, जर एखाद्या खातेदाराचे क्षेत्र अन्य खातेदारांमध्ये
विभागले गेल्यास हा आकार सर्व खातेदार निहाय वेगळा करावा लागतो. असा आकार खालील
सुत्रानुसार काढावा लागतो.
सात-बारा
वरील एकूण आकार ÷ (भागिले) सात-बाराचे एकुण
क्षेत्र x (गुणिले) ज्या क्षेत्राचा आकार काढायचा आहे ते क्षेत्र
या प्रकरणात जसे रामभाऊ, गणपत
आणि मारुती या तिघांच्या नावावर भूमापन क्रमांक १९२ आहे ज्याचे एकुण क्षेत्र ७ हेक्टर
२० आर आणि एकुण आकार रु.१२.३५ आहे. रामभाऊच्या नावे ३ हे हेक्टर ८० आर क्षेत्र
आहे, गणपतच्या नावे १ हेक्टर ५३ आर आणि मारुतीच्या नावे १ हेक्टर ८७ आर
क्षेत्र आहे.
प्रथम आपण रामभाऊच्या नावे असणार्या
३ हेक्टर ८० आर क्षेत्राचा आकार वरील सुत्रानूसार काढु.
सात-बारा वरील एकुण आकार रु.
१२.३५ ÷ (भागिले) सात-बाराचे एकुण क्षेत्र ७ हेक्टर २० आर x (गुणिले)
रामभाऊच्या नावे असणारे क्षेत्र ३ हेक्टर ८० आर म्हणजे रामभाऊच्या नावे आकार
रु. ६.५१. यानुसार इतर व्यक्तींचाही स्वतंत्र आकार काढता येईल.
तलाठी भाऊसाहेबांनी मंडलअधिकार्यांच्या मार्गदर्शनानुसार न्यायालयाच्या आदेशाचा अंमल दिला.
Comments