स्वत:च्या मालकीच्‍या क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्राची विक्री

 


५१. स्वत:च्या मालकीच्‍या क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्राची विक्री :

 

वाचा : भारतीय नोंदणी कायदा, कलम १७ ; महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १४९ व १५० ; मालमत्ता हस्तांतरण कायदा १८८२, कलम ५४.

 

गावात सोपानरावांची ५ एकर २० आर शेतजमीन होती. त्‍यांनी विक्रमला ५ एकर ३० आर क्षेत्राचे खरेदीखत करून दिले. व्यवहाराची कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर तलाठी यांनी गाव नमुना ६ मध्ये त्याची नोंद घेतली. सर्व हितसंबंधीतांना नोटीस बजावली. तलाठी भाऊसाहेबांना खात्री होती की, क्षेत्र जुळत नाही असा शेरा नोंदवून मंडलधिकारी ही नोंद निश्‍चित रद्‍द करणार.  

मुदत कालावधी संपल्‍यानंतर मंडलअधिकारी यांनी संबंधीत फेरफारवर निर्णय देण्‍याकामी कागदपत्रे पाहिली आणि सोपानरावांच्‍या मालकीच्‍या ५ एकर २० आर क्षेत्रापुरती नोंद विक्रमच्‍या नावे प्रमाणित केली.

तलाठी भाऊसाहेबांनी असे करण्‍याचे कारण विचारले असता मंडलअधिकार्‍यांनी खुलासा केला की,

"काही मंडलअधिकार्‍यांनी निश्‍चितपणे, क्षेत्र जुळत नाही असा शेरा नोंदवून ही नोंद रद्‍द केली असती परंतु त्‍यामुळे सोपानरावांना हिच शेतजमीन पुन्‍हा दुसर्‍याला विकण्‍याची संधी मिळाली असती, जर आपण क्षेत्र जुळत नाही परंतु दस्‍त नोंदणीकृत असल्‍यामुळे विक्रमचे नाव इतर हक्‍कात दाखल केले असते तरीही सोपानरावांचे नाव कब्‍जेदार म्‍हणूनच राहिले असते आणि ते विक्रमवर अन्‍याय केल्‍यासारखे झाले असते. आता उर्वरीत १० आर क्षेत्राचे पैसे सोपानरावांकडून कसे वसूल करायचे हा विक्रमचा प्रश्‍न आहे. आपण आपल्‍या बाजूने त्‍याला कायदेशीर न्‍याय दिला आहे."      


Comments

Archive

Contact Form

Send