सार्वजनिक उपद्रवाबाबत तक्रार

 


९४. सार्वजनिक उपद्रवाबाबत तक्रार :

 

वाचा : फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३, कलम १३३.

 

विठ्‍ठलरावांनी तलाठी चावडीत येऊन, तलाठी भाऊसाहेबांकडे तक्रार केली की, गावातील अंजूमन नावाच्‍या इमारतीतून बाहेर येणार्‍या सांडपाण्यामुळे दुर्गंधी पसरलेली असून जवळपासच्‍या लोकांना काम करता येणे अशक्य झाले आहे. अशा सांडपाण्यामुळे सार्वजनिक रोगराई पसरण्याचा धोका आहे. तुम्‍ही काहीतरी कारवाई करा.

तलाठी भाऊसाहेबांनी विठ्‍ठलरावांना सल्‍ला दिला की याबाबत त्‍यांनी तालुका दंडाधिकारी किंवा  उपविभागीय दंडाधिकारी यांच्‍याकडे लेखी तक्रार दाखल करणे योग्‍य होईल.

तालुका दंडाधिकारी आणि उपविभागीय दंडाधिकारी यांना फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ कलम १३३ अन्वये सार्वजनिक उपद्रवाविरूध्द कारवाई करण्‍याचे अधिकार आहेत.

पोलीस अहवाल किंवा खाजगी व्यक्तीने अथवा वृत्तपत्र, दूरदर्शन अथवा अन्य प्रकारे सार्वजनिक उपद्रवाबाबत मिळालेल्या माहितीवरून तालुका दंडाधिकारी किंवा उपविभागीय दंडाधिकारी या कलमान्वये कारवाई करू शकतात. जर कोणत्‍याही व्‍यक्‍तीने,

१. सर्वसामान्य लोक ज्या सार्वजनिक स्थळाचा/रस्त्याचा/नदीचा/जलमार्गाचा कायदेशीररित्या वापर करतात त्यात कोणीतरी बेकायदेशीरपणे अडथळा निर्माण केला आहे. किंवा

२. एखादा व्यवसाय/ठेवलेला माल, सर्वसामान्य लोकांच्या आरोग्याला घातक ठरु शकेल, किंवा

३. एखाद्या मालामुळे/इमारतीमुळे किंवा अन्य कारणामुळे आग लागू शकेल अथवा स्फोट होऊ शकेल अथवा या प्रकारच्या पदार्थाची विल्हेवाट करण्यास प्रतिबंध करणे आवश्यक आहे, किंवा

४. एखाद्या इमारत/तंबू/झाड यामुळे येणार्‍या-जाणार्‍या सर्वसामान्य लोकांना इजा होऊ शकेल, किंवा

५. एखाद्या खोदकामामुळे/ तलाव/विहिरीमुळे सर्वसामान्य लोकांना अपघात होऊ शकेल त्यामुळे अशा जागी कुंपण घालणे आवश्यक आहे, किंवा

६. कोणतेही धोकादायक जनावर नष्ट करणे/कोंडुन ठेवणे आवश्यक आहे, किंवा

७. एखाद्या घरातून/इमारतीतून बाहेर येणार्‍या सांडपाण्यामुळे दुर्गंधी पसरलेली असून लोकांना काम करता येणे अशक्य झाले आहे अथवा अशा सांडपाण्यामुळे सार्वजनिक रोगराई पसरण्याचा धोका आहे, किंवा

८. टोकदार खिळे रस्त्यावर पसरवण्यात आले आहेत, किंवा

९. एखाद्या व्यक्तीने सार्वजनिक विहिरीजवळ शौचालय बांधले आहे, किंवा

१०. एखाद्या व्यक्तीने सार्वजनिक जागेवर भिंत उभी केली आहे, किंवा

११. एखाद्या व्यक्तीने सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण केले आहे, किंवा

१२. एखाद्या व्यक्तीने सार्वजनिक रस्त्यावर चबुतरा बांधला आहे,

या किंवा अशा सार्वजनिक उपद्रवाची माहिती मिळताच तालुका दंडाधिकारी आणि उपविभागीय दंडाधिकारी यांनी फौ.प्र.सं. कलम १३३ अन्वये असा सार्वजनिक उपद्रव निर्माण करण्यास कारणीभूत व्यक्तीला सशर्त आदेश काढु शकतात आणि अशा व्यक्तीस आवश्यक तो अवधी देऊन सदर उपद्रव बंद करण्यासाठी/इतरत्र हलविण्यासाठी आदेश पारित करावा किंवा म्हणणे मांडण्यासाठी समक्ष हजर राहण्याचा आदेश पारित करू शकतात.

फौ.प्र.सं. कलम १३५ अन्वये आदेश बजावला गेल्यानंतर संबंधीत व्यक्तीने असा उपद्रव नमूद अवधीत दूर केला पाहिजे किंवा समक्ष हजर राहून म्हणणे सादर केले पाहिजे.

फौ.प्र.सं. कलम १३५ अन्वये आदेश बजावला गेल्यानंतरही संबंधीत व्यक्तीने असा उपद्रव नमूद अवधीत दूर केला नाही किंवा समक्ष हजर राहून म्हणणे सादर केले नाही आणि आदेशाचे पालन केले नाही तर फौ.प्र.सं. कलम १३६ अन्‍वये अशी व्यक्ती भारतीय दंड संहिता, कलम १८८ अन्वये कारवाईस पात्र ठरते.   

Comments

Archive

Contact Form

Send