एकाच वेळेस ताबा साठेखत आणि खरेदीखत

 


४९. एकाच वेळेस ताबा साठेखत आणि खरेदीखत :

 

वाचा : भारतीय नोंदणी कायदा, कलम १७ ; महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १४९ व १५० ; मालमत्ता हस्तांतरण कायदा १८८२, कलम ५३-अ.

 

यशवंतरावांनी स्वत:च्या मालकी हक्काच्‍या शेतजमिनीचे नोंदणीकृत ताबा साठेखत शंकरला करून दिले. त्‍याच महिन्‍यात त्‍यांनी तीच शेतजमीन सुधाकरला नोंदणीकृत दस्ताने विकली. पुढील महिन्‍यात नोंदणी कार्यालयातून या दोन्‍ही व्यवहाराची कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर तलाठी भाऊसाहेब थोडे गोंधळले. तरीही यांनी गाव नमुना ६ मध्ये त्याची नोंद घेतली. सर्व हितसंबंधीतांना नोटीस बजावली. परंतु पुढे मंडलअधिकारी याबाबत काय निर्णय घेणार याची उत्‍सुकता त्‍यांना होती.

सर्व हितसंबंधीत हजर राहिल्यानंतर तलाठी भाऊसाहेबांनी त्या सर्वांची संमतीदर्शक स्वाक्षरी नोटीस पुस्तकावर घेतली.

मुदत कालावधी संपल्‍यानंतर मंडलअधिकारी यांनी संबंधीत फेरफारवर निर्णय देण्‍याकामी कागदपत्रे पाहिली आणि निर्णय दिला की,

सदर मिळकतीचे नोंदणीकृत ताबा साठेखत आधी झाले आहे. नोंदणीकृत ताबा साठेखत करतांना यशवंतराव जमिनीचे मालक होते. त्‍यामुळे त्‍यांनी करुन दिलेल्‍या नोंदणीकृत ताबा साठेखतानुसार शंकरला सदर मिळकत ताब्‍यात ठेवण्‍याचा हक्‍क प्राप्‍त होतो परंतु नोंदणीकृत ताबा साठेखतानुसार शंकरला त्‍या जमिनीचा मालकी हक्‍क प्राप्‍त होत नाही म्‍हणून शंकरचे नाव इतर हक्‍कात दाखल करण्‍यात यावे. त्‍यानंतर केलेल्‍या नोंदणीकृत खरेदी दस्तानुसार यशवंतरावांचा मालकीहक्‍क सुधाकरच्‍या नावे हस्‍तांतरीत होतो. त्‍यामुळे यशवंतरावांचे नाव कमी करुन सुधाकरचे नाव कब्‍जेदार सदरी नोंदविण्‍यात यावे.  

Comments

Archive

Contact Form

Send