एकत्र कुटुंबाच्या संपूर्ण मिळकतीचे मृत्यूपत्र
८५. एकत्र कुटुंबाच्या संपूर्ण
मिळकतीचे मृत्यूपत्र :
वाचा : भारतीय वारसा कायदा १९२५, कलम २, ६८ ; हिंदू उत्तराधिकार अधिनियम-१९५६; महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १४९.
सखाराम
हा एकत्र कुटुबांचा कर्ता होता. त्याने त्याच्या एकत्र कुटुबांच्या संपूर्ण
मिळकतीचे मृत्युपत्र त्याचा पुतण्या धिरजच्या नावे केले होते. सखाराम मयत
झाल्यानंतर धिरजने हजर केलेल्या मृत्युपत्रानुसार वारस ठराव मान्य करण्यात
आला. त्याची नोंद तलाठी यांनी गाव नमुना ६ मध्ये नोंदविल्यानंतर सर्व हितसंबंधीतांना
नोटीस बजावली.
नोटीस
मिळाल्यानंतर मयत सखारामचा मुलगा सचिन तलाठी भाऊसाहेबांकडे आला आणि त्याने या
नोंदीवर लेखी हरकत दाखल केली.
तलाठी भाऊसाहेबांनी त्याला तक्रारीची
पोहोच नमुना १० मध्ये दिली.
मंडलअधिकारी
चावडीला भेट देण्यास आले तेव्हा तलाठी यांनी ही तक्रार त्यांच्या निदर्शनास आणली. मंडलअधिकारी यांनी नमुना
१२ मध्ये सर्व हितसंबंधीतांना नोटीस देऊन पंधरा दिवसानंतर सर्वांना त्याच चावडीत, पुराव्याच्या कागदपत्रांसह
हजर ठेवण्याचे निर्देश तलाठी यांनी दिले.
सुनावणीच्या
दिवशी सचिनने त्याचे म्हणणे दाखल केले की, मयत सखारामने मृत्यूपत्रानुसार धिरजला
दिलेली मिळकत ही एकत्र कुटुंबाची असल्यामुळे, त्यावर सर्व वारसांचा अधिकार आहे.
त्यामुळे एकत्र कुटुंबाची सर्व मिळकत मृत्युपत्राने देता येणार नाही.
धिरजने
त्याचे म्हणणे मांडले की, त्याच्याकडे असलेले मृत्युपत्र खरे आहे त्यामुळे
ती मिळकत त्याच्या नावे करण्यात यावी.
मंडलअधिकार्यांनी सर्वांचे म्हणणे
नोंदवून निकाल पत्रात नमूद केले की,
वाद
मिळकत ही एकत्र कुटुंबाची होती हे सिध्द झाले आहे. मयत सखाराम हा जरी एकत्र
कुटुबांचा कर्ता असला तरी एकत्र कुटुंबाच्या मिळकतीवर सर्व वारसांचा अधिकार आहे.
त्यामुळे एकत्र कुटुंबाची सर्व मिळकत मृत्युपत्राने देण्याचा मयत सखारामला
अधिकार नाही. त्यास फक्त एकत्र कुटुंबातील, त्याच्या हिस्स्याची मिळकत मृत्युपत्राने
देता येऊ शकेल. (ए.आय.आर. २००७, एन.ओ.सी. १६३१, मुंबई). त्यामुळे
वादीचे म्हणणे मान्य करुन, सर्व वारसांची नावे अधिकार अभिलेखात लावण्याचा आदेश
देण्यात येत आहेत. जरूर तर प्रतिवादीने मृत्यूपत्र दिवाणी न्यायालयातून सिध्द
करुन आणावे.
Comments